Shivsena | “निवडणूक आयोगाने निर्णय देण्याआधी ‘ते’ 16 आमदार…”; कायदेतज्ञांचं शिवसेनेबाबत महत्वाचं वक्तव्य

Shivsena |  मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरीनंतर केवळ सरकारच पडले नाही, तर शिवसेना कोणाची असा प्रश्न देखील उपस्थित झाला. सेनेचा हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातही गेला. सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्ह आणि पक्ष कोणाचा हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपावला. त्यानंतर निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी होत आहे. निवडणूक आयोग ‘शिवसेना कोणाची’ यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

“मला व्यक्तिगत असं वाटतं की, आधी निवडणूक आयोगाने 16 आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत हे बघितलं पाहिजे. 16 आमदार अपात्र ठरले, तर उरलेले आमदारही अपात्र होतील. म्हणजे 40 आमदार अपात्र होतील. अशावेळी शिवसेना पक्ष कोणाचा ठरणार? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आधी लागला पाहिजे आणि नंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय दिला पाहिजे. तोपर्यंत या प्रकरणाचा निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवला पाहिजे,” असे उल्हास बापट म्हणाले आहेत.

“कलम 15 अंतर्गत दोन गट झाले तर त्यातील जो गट मान्य होईल त्याला चिन्ह दिले जते. मात्र, निवडणूक आयोगाला दोघांचेही निश्चित सिद्ध होत नाही असे वाटले, तर दोघांनाही चिन्ह दिले जात नाही. मला वाटते आत्ता निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये. कारण 16 आमदार अपात्र आहेत असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, तर निवडणूक आयोगाचा आत्ताचा निर्णय हास्यास्पद ठरेल. कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा मागच्यावेळी निवडणूक आयोगातील सुनावणीमध्ये मांडला होता”, असेही उल्हास बापट म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोग शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबात काय निर्णय घेणार? कोणाच्या  बाजूने निकाल देणार? यावरुन राज्याच्या राजकाराणात काय घडामोडी घडणार? असे अनेक प्रश्न सध्या  पडले आहेत.

महत्वाच्या बातम्या