Raosaheb Danve | “पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांचाच स्वार्थीपणा”; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

Raosaheb Danve | पुणे : पुणे शहरात पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यासाठी भाजप, महाविकास आघाडीचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी दानवे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधी बाबत वक्तव्य केले आहे.

“पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांचाच स्वार्थीपणा”

“पहाटेची शपथ घेऊन अजित पवार यांनीच स्वार्थीपणा केला. आमच्यासोबत गणिते जुळली नाहीत म्हणून पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली”, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. “स्वार्थी अजित पवार की आम्ही? पहाटेची शपथ आमच्यासोबत घेऊन अजित पवारांनी स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. गणिते जुळत नसल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली. मागे वसंतदादा सोबत हातमिळवणी केली. मग सांगा आम्ही स्वार्थी की अजित पवार? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.

“मोडतोडीचे राजकारण कोणी केले?”

“आम्ही कोणासोबतही गेलो तरी भाजपचे मूळ विचार आहेत त्याला फाटा देत नाहीत. स्वार्थी आम्ही की ते, हे चिंचवड पोटनिवडणुकीत नागरिक दाखवून देतील. मोडतोडीचे राजकारण कोणी केले? मोडतोड तर त्यांनी केली आमचे असलेले त्यांनी मोडले. त्यांचे आम्ही मोडले तर फरक काय पडला?” असेही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

“दोन हजार कोटी आले कुठून, दिले कोणाला?”

“शिवसेना चिन्हाबाबत दोन हजार कोटींचा सौदा झाला, असा असरोप संजय राऊत यांनी केला. यावर कोर्ट निर्णय देईल. आम्ही आणि ते कोर्टात जाणार आहोत. दोन हजार कोटी आले कुठून, दिले कोणाला? भाजपने अशा प्रकारचे व्यवहार कधीही केलेले नाहीत”, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधत स्वार्थी भाजपला चिंचवडमधून हद्दपार करण्याचे आवाहन जनतेला केले होते. यावर दानवे यांनी सदर प्रतिक्रिया दिली. आढावा बैठकीला भाजप आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-