पैठण | किरण काळे पाटील – मित्रांसोबत रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर (Ganpatipule) पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने अचानक झडप घातली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन (ता. पैठण) येथून १९ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेला होता. आज (२० जून) सकाळी १० च्या सुमारास यातील काही तरुण समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले. पण पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले. यात ३ जणांना वाचवण्यात स्थानिक बचाव पथकाला यश आले असले तरी ५ जण अद्याप बेपत्ता आहेत.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात बुडालेले सर्व तरुण हे विशीतले आहेत. यामध्ये आदित्य संतोष राऊत (वय २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय २०), आनंद राजू नरवडे (वय २०), प्रेम दीपक आदमाने (वय १९) आणि यश रामेश्वर कांबळे (वय १९) यांचा समावेश आहे. हे सर्वजण बिडकीनचे रहिवासी आहेत. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या या तरुणांवर असा प्रसंग ओढवल्याने बिडकीन गावात मोठी शोककळा पसरली आहे.
गणपतीपुळे दुर्घटना: लाटांच्या वेगाचा अंदाज चुकला आणि थरार घडला
समुद्रात सध्या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. त्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि जीवरक्षकांकडून बोटींच्या साहाय्याने बेपत्ता तरुणांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
पर्यटकांनी समुद्रात उतरताना जीवरक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जाते. तरीही पाण्याचा अंदाज चुकल्याने अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. सध्या सर्वत्र या बेपत्ता तरुणांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह! ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हा निकाल दुर्दैवी”
- पवनराजे निंबाळकर हत्याकांडात पद्मसिंह पाटील दोषमुक्त, २० वर्षांनंतर निकालात नेमकं काय घडलं?
- ‘पुरावे अपुरे’ म्हणत न्यायालयाचा निर्णय; पवनराजे निंबाळकर केसचा निकाल जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












