मुंबई – संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे ( Santosh Deshmukh murder case ) फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असताना, विधानभवनात मात्र नेते वेगळ्याच मुद्द्यावर गोंधळ घालत होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ घालण्यात आला. मात्र, गेल्या वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक अपमानास्पद वक्तव्ये करण्यात आली, तेव्हा हेच नेते शांत का होते? असा सवाल उपस्थित होत आहे.
अलीकडेच प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपतींविषयी वादग्रस्त विधान केले होते. मात्र, ते संघ आणि भाजपशी संलग्न असल्याने त्यांच्या वक्तव्यांवर कोणीही आक्षेप घेतला नाही, ना त्यांच्या अटकेची मागणी केली गेली. अबू आझमी हे विशिष्ट समाजाचे असल्याने सरकारमधील नेत्यांनी मोठा गोंधळ घातला, पण कोरटकर आणि सोलापूरकर यांना माफी का दिली जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्षभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता. या घटनेने महाराष्ट्रातील शिवप्रेमी संतप्त झाले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपीला सरकारने निवडणुकीनंतर जामीन मंजूर केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आहे. एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सभागृहात गोंधळ घालणारे सत्ताधारी, दुसऱ्या बाजूला छत्रपतींच्या पुतळ्याचा अपमान करणाऱ्यांना अभय देणारे हेच नेते, हा दुटप्पीपणा महाराष्ट्राने पाहिला आहे.
यामुळे सरकारची “छत्रपतींप्रती असलेली निष्ठा फक्त राजकीय लाभासाठी आहे का?” असा संतप्त सवाल शिवप्रेमी आणि विरोधकांकडून विचारला जात आहे. जर महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान करणाऱ्यांना अभय मिळणार असेल, तर राज्यातील जनतेचा विश्वास सरकारवर राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो पाहून राज्यातील जनता व्यथित झाली आहे. मात्र, जनतेचे प्रतिनिधी या गंभीर विषयावर चर्चा करण्याऐवजी केवळ राजकीय गोंधळ करण्यात मग्न असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र पेटलेला असताना, विधानभवनात मात्र लोकप्रतिनिधी केवळ आपली राजकीय समीकरणे सांभाळण्यात गुंतले आहेत, हे दुर्दैवी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य गुंडांच्या हातात? सरकार मंत्र्यांना वाचवण्यात व्यस्त!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराजांनी स्वतःपेक्षा स्वराज्य आणि प्रजेच्या रक्षणाला प्राधान्य दिले. मात्र, आज त्यांच्या स्वराज्यात गुंड मोकाट सुटले असून, सरकार हे मंत्र्यांना वाचवण्यात वेळ वाया घालवत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना, सत्ताधारी पक्ष या गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचे आरोप होत आहेत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य जनता भयभीत असताना सरकार मात्र आपल्या मंत्र्यांना वाचवण्यात व्यस्त आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यात गुन्हेगारी वाढली असून, सत्ताधारी गुंडांना अभय देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे. छत्रपतींच्या विचारांना गालबोट लागणार नाही, अशी ग्वाही सरकारने जनतेला द्यायला हवी, मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे होताना दिसत नाही.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असताना, सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या मूल्यांचे काय होईल? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या