Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आता राज्याचे वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
स्वराज्य पक्षाचे संस्थापक, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो बाहेर पडल्याने या प्रकरणातील फक्त आरोपींचेच नाही तर त्यांना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे तसेच या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे,” असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
“धनंजय मुंडे या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी अडीच महिन्यांपूर्वी केली होती. पण लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले,” असा दावा देखील संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
“तुम्ही मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे. जर मुंडेंकडे किंचित नैतिकता असती तर त्यांनी अडीच महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला असता,” असा टोला संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला आहे.
Sambhaji Raje on Dhananjay Munde
संभाजीराजे छत्रपती यांच्या आरोपामुळे राजकीय वादाला तोंड फुटू शकते. यामुळे राजकीय वातावरण पेटू शकते. यावर आता धनंजय मुंडे आणि अजित पवार गट काय प्रत्युत्तर देतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :