Nana Patole | मुंबई : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ‘नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं नसतं’, असं वक्तव्य महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केलं होतं. राज्यात या मुद्द्यावरुन राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यातच आता नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प‘ या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका मांडली आहे.
“मी माझे मित्र संजय राऊत यांचे परवाच आभार व्यक्त केले की, त्यांनी माझ्या शक्तीची जाणीव मला करुन दिली. जसं रामायणात हनुमान यांना संजीवनी आणायची जबाबदारी आली तेव्हा ते थेट पाहाड उचलून आले होते. संजय राऊतांनी देखील मला माझ्या शक्तीची जाणीव करुन दिली. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले”, असं नाना पटोले मिश्किलपणे म्हणाले आहेत.
“पहाटेचं सरकार पडल्यानंतर”
“खरंतर महाविकास आघाडी सरकार हे एका विचित्र परिस्थितीत निर्माण झालं हे मी आजच नाही तर आधीसुद्धा सांगितलंय. पहाटेचं सरकार पडल्यानंतर जी काही परिस्थिती झाली आणि आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला की, महाराष्ट्राच्या जनतेवर पुन्हा निवडणुका येऊ नये म्हणून भूमिका घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
“हायकमांडने राजीनामा द्यायला सांगितला”
“महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आमचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण असे अनेक नेते मंत्री झाले. मग माझ्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. मी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने कायद्यानुसार पुढे घेऊन जात होतो. पण त्याचवेळी हायकमांडला वाटलं की संघटना कुठेतरी कमी पडतेय. त्यामुळे हायकमांडने राजीनामा द्यायला सांगितला. हायकमांडच्या आदेशानंतर मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर जे काही खोक्याचं सरकार आलं, जी काही स्थिती झाली ते पूर्ण राज्याने पाहिलं. पण मी अध्यक्षपदी राहिलो असतो तर सरकार वाचलं असतं हे आमच्या संजय राऊतांनी सांगण माझ्यासाठी अभिमानास्पदच आहे”,असे नाना पटोलेंनी सांगितले आहे.
“शरद पवारांनी सुद्धा माझी शक्ती ओळखली”
“राष्ट्रवादीच्या पक्षाच्या वतीने अजित पवार किंवा जयंत पाटील यांना मुख्यमंत्री ठेवायचं तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा जो अधिकार आहे तो त्यांनी वापरला. शरद पवार यांनी भूमिका मांडली. पण शरद पवारांनी सुद्धा माझी शक्ती ओळखली त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.
“मला खंत म्हणायचं काही कारण नाही. मी माझ्या नेत्याचा आदेश पाळला त्यालाच मी माझा स्वाभिमान मानतो. कारण ज्यावेळेस राजीनामा द्यायचा होता तेव्हा उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना भेटा आणि राजीनाम्याचं सांगा, असं सांगा मग राजीनामा द्या, असं सांगितलं होतं. मी त्यानुसार त्यांना सांगून राजीनामा दिला”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Raut | “दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर….”; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
- Ajit Pawar | “बेडकाचं फुगलेपण काही खरं नसतं”; अजित पवारांचा राहुल कलाटेंना खोचक टोला
- Ajit Pawar | “शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीत बदला घ्यायाचाय”; जाहीर सभेत अजित पवारांचं वक्तव्य
- Nana Patole | परमबीर सिंह, अनिल देशमुख प्रकरणावरुन नाना पटोलेंनी घेतला भाजपचा समाचार
- Ajit Pawar | “शिंदेंचं बंड नाही तर गद्दारी होती”; अजित पवारांची शिंदे गटावर बोचरी टीका