🕒 1 min read
मुंबई – एखादा नेता निवडून आणण्यासाठी चक्क १०० ते १५० कोटी रुपयांचा बाजार मांडला जातो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल ना? विधानपरिषद निवडणुकीत सुरू असलेल्या घोडेबाजारावर बोट ठेवत खासदार संजय राऊत यांनी हाच मोठा गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलंय. मात्र या सगळ्या प्रक्रियेवरून राऊतांनी महायुतीला थेट टार्गेट करत राजकारण चांगलेच तापवले आहे.
Sanjay Raut targets Girish Mahajan over MLC Election
भाजपचे नेते गिरीश महाजन यांना राऊतांनी चांगलेच धारेवर धरले. “कसले आलेत संकटमोचक? इथे १००-१५० कोटी रुपये निव्वळ खर्च केले जात आहेत. मतदार दोन्ही बाजूंकडून १०-२० लाख रुपये घेतील आणि पुढच्या पाच वर्षांची बेगमी करतील,” असा थेट आरोप करत राऊतांनी महायुतीच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.
पैशांच्या या खेळामुळे निवडणुकांना आता काही अर्थच उरला नसल्याचे ते म्हणाले. एकेकाळी आचार्य अत्रे, ग. दी. माडगुळकर आणि ना. धो. महानोर यांच्यासारखी मोठी, अभ्यासू माणसं या सभागृहात जात होती. आता मात्र हे सभागृह फक्त पैशावाल्यांचे आणि उद्योगपतींचे ‘डंपिंग ग्राऊंड’ झाल्याची अत्यंत बोचरी टीका त्यांनी केली.
नाशिकच्या जागेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, तिथे आमचा अधिकृत उमेदवार नाही. तिथे महायुतीमध्येच मुख्य लढाई होणार असून ‘ज्याचा भाव जास्त, तो निवडून येईल’. नाशिकमध्ये आमचे जवळपास ६० मतदार असल्याचे समजते, पण पक्षाने अधिकृत कुणालाही उमेदवारी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, भाजपने नेहमीच दबावाचे राजकारण केल्याचा दावा राऊतांनी केला. प्राजक्त तनपुरे यांच्यासारखे अनेक नेते जे आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेत राहिले, ते आता तिकडे जात आहेत. विचारधारा सोडणाऱ्यांना आणि त्यांना सोबत घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.
केवळ उद्योगपती आणि ठेकेदारांच्या मुलांना विधान परिषदेवर पाठवले जात असल्याने राऊतांनी संताप व्यक्त केला. आमच्यासारखे लाखो लोक विचारधारेशी जोडलेले असताना, केवळ पैशाच्या जोरावर सभागृहात येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे आता विधान परिषद आणि राज्यसभा ही सभागृहे नसलेलीच बरी, अशी धक्कादायक मागणी त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाफेडचा मोठा निर्णय, कांदा खरेदीच्या जाचक अटी शिथिल; शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?
- सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्जमाफीत जाचक अटींचा खोडा, १२ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












