Balasaheb Thorat | “तो शपथविधी शरद पवार यांना विचारून..”; पहाटेच्या शपथविधीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर 2019 साली घेतलेल्या शपथविधीवरून पुन्हा एका राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच हा शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता’, असे खळबळजनक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘फडणवीस हे सुसंस्कृत ग्रहस्थ आहेत, ते असत्याचा आधार घेतील, असे मला वाटले नव्हते’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यावरच आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणेज ते शरद पवार आहेत. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असता तर ते सरकार पडलेच नसते. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नाही, या मताचा मी आहे,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

“काहीतरी वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काहीही नाही. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे, हे भाजपच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप थोरात यांनी केला आहे.

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

“शरद पवारांनी अनुमती दिली, असं देवेंद्र फडणवीस सांगतात, तेव्हा माझ्यासारख्यांना विश्वास बसतो. देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य केलं, तेव्हा पहिल्या 23 नोव्हेंबर 2019चा दिवस आठवला. कारण, शपथविधीच्या दिवशी मी चंद्रपुरला होतो. शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना फोन केला, ते म्हणाले शरद पवार आपल्याबरोबर आहेत. दोन दिवसांनी सर्व व्यवस्थित होईल. पण, नंतर घडलेल्या घटनेनंतर मलाही आश्चर्य वाटलं”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.