Sudhir Mungantiwar | फडणवीसांच्या दाव्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

Sudhir Mungantiwar | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर 2019 साली घेतलेल्या शपथविधीवरून पुन्हा एका राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच हा शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

“शरद पवारांनी अनुमती दिली, असं देवेंद्र फडणवीस सांगतात, तेव्हा माझ्यासारख्यांना विश्वास बसतो. देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य केलं, तेव्हा पहिल्या २३ नोव्हेंबर २०१९ चा दिवस आठवला. कारण, शपथविधीच्या दिवशी मी चंद्रपुरला होतो. शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना फोन केला, ते म्हणाले शरद पवार आपल्याबरोबर आहेत. दोन दिवसांनी सर्व व्यवस्थित होईल. पण, नंतर घडलेल्या घटनेनंतर मलाही आश्चर्य वाटलं”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

“अजित पवार एवढं मोठं पाऊल कसं उचलू शकतात”

“मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय अजित पवार एवढं मोठं पाऊल कसं उचलू शकतात. अजित पवार हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की, आपल्याला स्थिर सरकारच्या दिशेने जायचं आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे, अशा प्रसंगात राज्यातील जनतेला न्याय द्यायचं आहे. मग, भिजतं घोंगडं ठेऊन राज्यात स्थिर सरकार देऊ शकणार नाही,” असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

“अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काही गट असतील असं वाटत नाही. कारण, अजित पवारांच्या भाषणात शरद पवारांचा उल्लेख सन्मानाने केला जातो. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांच्यात मतभेद असल्याचं वाटत नाही,” असेही सुधीर मुनगंटीवर म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा दावा

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-