दिल्ली– संसदेत एकीकडे गदारोळ सुरू असताना, दुसरीकडे सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींच्या दालनात का पोहोचल्या? दिल्लीत सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) ८ खासदारांनी थेट मोदींची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील ही भेट निव्वळ सदिच्छा होती. पण संसदेच्या दालनात झालेल्या या बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बैठकीच्या सुरुवातीलाच एक वेगळं चित्र दिसलं. मोदींनी अत्यंत आस्थेने शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नुसती चौकशी नाही. तर पवारांच्या कामाची ऊर्जा आणि उत्साह राजकारणात सर्वांसाठी एक आदर्श असल्याचं मोदी म्हणाले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.
महाराष्ट्रातील महापुरुषांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मोठी मागणी खासदारांनी लावून धरली. महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा यात समावेश होता. ही मागणी महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेली आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उजनीचं पाणी मांजरा धरणात सोडण्याची आग्रही मागणी केली. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यावरही चर्चा झाली. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, मेट्रो आणि छत्रपती संभाजीनगरमधील ‘पीएम गतिशक्ती’ योजनांच्या कामाला गती देण्याकडे लक्ष वेधण्यात आलं.
कर्करोग उपचारांसाठी ‘पीएम केअर्स’चा कोटा वाढवण्याची विनंतीही करण्यात आली. खासदार निलेश लंके यांनी वाढत्या कर्करोगाच्या धोक्यावर चर्चा केली. शिवाय कांद्याचे भाव आणि चंद्रभागा प्रदूषण यावरही मंथन झालं. सध्या संसदेचं कामकाज ठप्प आहे. त्यामुळे थेट मोदींनाच गाठून जनतेचे प्रश्न मांडल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. यामागे कोणताही राजकीय हेतू नसून, केवळ महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास असल्याचं खासदारांनी नमूद केलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘इथेनॉल पेट्रोलमध्ये नव्हे, खड्ड्यांत टाका’; आदित्य ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
- गडचिरोलीतील सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीसांनी मागवला अहवाल
- गडचिरोली हादरलं! आश्रम शाळेत रात्री सर्पदंश; ३ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू













