पैठण | किरण काळे पाटील: संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्थेच्या (Shikshak Patsanstha) कारभारावरून सभासदांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नवीन भूखंड खरेदीच्या नावाखाली संस्थेची सुमारे 4 कोटी 24 लाख 90 हजार 475 रुपयांची गंगाजळी आणि 44 लाख 51 हजार 398 रुपयांचा इमारत निधी लाटला जाण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे. या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेने पैठणच्या सहाय्यक निबंधकांकडे 8 सप्टेंबर 2026 रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यमान संचालक मंडळाने सलग तीन वर्षांच्या (2022-23, 2023-24 आणि 2024-25) वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये एकही ठराव बहुमताने मंजूर केलेला नाही. ज्या सभासदांची सभेला प्रत्यक्ष उपस्थिती नसते, त्यांची नावे सूचक म्हणून ठरावात दाखवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
Sant Eknath Maharaj Shikshak Patsanstha Paithan Fund Dispute
संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्था: वार्षिक अहवालातील त्रुटी आणि सभासदांच्या मागण्या
सन 2025-26 च्या वार्षिक अहवालात मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये कर्जमर्यादा वाढवणे, मध्यम मुदत कर्ज वाढवणे, सभासद वर्गणी वाढवणे, मालमत्ता खरेदी करणे आणि सुधारित आदर्श उपविधी लागू करणे असे महत्त्वाचे विषय आहेत. मात्र, वार्षिक अहवालामध्ये याबाबत कुठेही स्पष्ट नोंद नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाने 8 सप्टेंबर रोजी संचालक मंडळाला दिलेल्या निवेदनात 20 प्रमुख मागण्यांची रजिस्टरमध्ये लेखी नोंद घेऊन कार्यवाहीची मागणी केली आहे.
विष्णू भिंगारे, गोविंद तोटेवाड आणि श्री लिंबराज भंडारे यांना सलग तीन वर्षे अर्ज देऊनही सभासद करून घेतले जात नाही. मागील वर्षी चेअरमनने आश्वासन देऊनही ही टाळाटाळ होत आहे. या तिघांना त्वरित सदस्यत्व द्यावे आणि जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार 1000 सभासद करण्याचे धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, निवडणूक जाहीरनाम्यानुसार कर्जाचा व्याजदर 8 टक्क्यांपर्यंत खाली आणणे, सर्वसाधारण कर्ज मर्यादा 30 लाख रुपये करणे, ठेवीवर 10 टक्के व्याज देणे आणि तातडीचे कर्ज 2 लाख रुपये करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.
कोणताही ठराव नसताना शेअर्स मर्यादा 2 लाख रुपयांवरून थेट 5 लाख रुपये करण्यात आली आहे, ती पूर्ववत करावी. पूर्वी नसलेले 12 टक्के व्याजदराचे मध्यम मुदतीचे कर्ज सभासदांवर लादले जात असून, ते बंद करून सर्वसाधारण कर्जामध्ये वर्ग करावे. मयताचे 14 टक्के व्याजदर रद्द करावे, मयत निधी कर्जाएवढा म्हणजे 21 लाख रुपये करावा आणि जुनी पेन्शन (NPS) नसलेल्यांसाठी 5 लाख रुपये जास्तीचा मयत निधी द्यावा, अशी मागणी निवेदनात आहे. इतर बँकांप्रमाणे स्वतंत्र वाहन कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि मासिक वर्गणी वाढवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संचालक मंडळाने त्यांच्या जाहीरनाम्यानुसार आमसभेचा संपूर्ण खर्च (मंगल कार्यालय, जेवण, भेटवस्तू) स्वतः करावा. सध्या पतसंस्थेतील भेटवस्तू, हळदी-कुंकू, नाथ षष्ठीतील पाणी वाटप आणि महिला दिनाच्या खर्चाबाबत कोणालाही विश्वासात न घेता मनमानीपणे खर्च करून संचालक मंडळ स्वतःची जाहिरात करत आहे. या वारेमाप खर्चावर निर्बंध घालून अतिनिकडीच्या खर्चासाठी एकूण सभासदांच्या 2/3 बहुमताने लेखी मान्यता घ्यावी. तसेच गंगाजळी आणि इमारत निधीला हात लावू नये, नवीन भूखंडाची आवश्यकता नसल्याने खरेदी करू नये आणि याबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास सभासदांच्या 2/3 बहुमताने लेखी ठराव घ्यावा, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
या संपूर्ण सर्वसाधारण सभेचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ शूटिंग करावे. सभेचे निर्णय आणि शिक्षक संघाच्या निवेदनाचे लेखी उत्तर 7 दिवसांच्या आत देण्यात यावे, अशी अटही निवेदनात घालण्यात आली आहे.
या प्रकरणावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पैठण तालुकाध्यक्ष योगेश्वर शिसोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गंगाजळीला हात लावल्यास पतसंस्था वाचविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. गेल्या 60 वर्षांपासून शिक्षकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या पतसंस्थेची जवळपास सव्वाचार कोटी रुपयांची गंगाजळी आणि 44.5 लाख रुपयांचा इमारत निधी आहे. नवीन भूखंड अथवा जागा खरेदी करण्याबाबत कोणत्याही सभासदाची लेखी मागणी नाही. सभासदांना विश्वासात न घेता संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने ठराव घेण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. सभासदांच्या दोन तृतीयांश बहुमताशिवाय असा निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्यास निबंधक कार्यालयाकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल,” असा इशारा शिसोदे यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मिर्झापूरची बॉक्स ऑफिसवर हवा! रिलीजआधीच जमवला कोट्यवधींचा गल्ला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्ड
- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची वर्णी!
- मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, पोलिसांच्या नकारावर आता एकटेच मुंबईत उपोषणाला बसणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











