माढा, 1 नोव्हेंबर: सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मदतीचा मोठा हात दिला आहे. माढा तालुक्यातील तुळशी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई पाहिल्यानंतर त्यांनी थेट ५० लाख रुपयांचा धनादेश गावाला मदत म्हणून दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे तुळशी गावातील नागरिकांनी आपले गाव चक्क विक्रीला काढले होते. या गंभीर समस्येची दखल घेत पवारांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष आर्थिक मदत केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
शरद पवार यांनी बारामतीतून या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली असून, ते पुढील तीन दिवस सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पंढरपूरचा दौरा आटोपून ते आज माढा तालुक्यात पोहोचले व त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
फळबागांच्या नुकसानीसाठी तातडीने मदत द्यावी आणि दुष्काळाची तीव्रता पाहता उपाययोजना आखण्यासाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करणारे पत्र पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. तसेच, दुष्काळी भागातील हे प्रश्न खासदार सुप्रिया सुळे थेट पंतप्रधानांकडे मांडणार आहेत.
प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा सर्व पिके वाळून गेल्याचे विदारक चित्र असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. माढ्यातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. १९७२ मध्ये असाच दुष्काळ असताना आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होतो आणि त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत केली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
राज्यामध्ये यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ३५८ पैकी तब्बल ३०५ तालुक्यांमध्ये स्थिती अत्यंत गंभीर आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, या संकटात सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती नाही”: ऋषभ पंतच्या उपलब्धतेवर गौतम गंभीरचे स्पष्टीकरण
- महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ९० किमी वेगाने वाहणार वादळी वारे
- देवेंद्र फडणवीस घाशीराम कोतवाल अन् पांडू हवालदार; ‘चीन फंडिंग’च्या आरोपावरून काँग्रेस नेत्यांचा जोरदार पलटवार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








