मुंबई, 3 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे नेते पार्थ पवार यांच्या एकतर्फी कार्यपद्धतीबाबत ज्येष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी आणि उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी निवड करताना वरिष्ठ सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. कोणालाही न विचारता थेट निर्णय घेतल्यामुळे कमिटीमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
यापूर्वी पक्षाच्या युवक आणि युवती अध्यक्षांच्या निवडीवेळीही सर्वानुमते निर्णय होणे अपेक्षित होते, मात्र तिथेही पार्थ पवार यांनी कोअर कमिटीला डावलल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला पार्थ पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित नव्हत्या. मात्र, भविष्यातील सर्व राजकीय आणि संघटनात्मक निर्णय हे अनुभवी नेत्यांशी चर्चा करूनच घेतले जावेत, अशी ठाम भूमिका उपस्थित नेत्यांनी मांडली. यावर पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून यापुढे ज्येष्ठ नेत्यांशी योग्य समन्वय साधला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे समजते.
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या चर्चेचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांच्याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पहिली मागणी राज्याच्या अर्थ खात्याशी संबंधित आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे घेतले होते. त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याने हे खाते त्यांना मिळावे, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. अद्याप हे खाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली आहे.
याव्यतिरिक्त, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे एकत्रीकरण नको, अशी स्पष्ट भूमिकाही कोअर कमिटीच्या नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर मांडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पक्षातील नेते आणि आमदारांमधील थांबलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी उद्या सर्व आमदारांची एकत्रित बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सर्व मंत्री आणि आमदारांनी तत्काळ दुष्काळी भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना मदत करावी, असा सर्वानुमते निर्णय या बैठकीत झाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजू तडवी बिडकीनचे नवे प्रभारी
- शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना थेट मदत; पाणीटंचाईग्रस्त तुळशी गावाला दिला ५० लाखांचा धनादेश
- न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








