Laxman Hake : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र (OBC Certificates) असल्याचा महत्त्वपूर्ण दावा केला आहे. या विधानामुळे काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी या विधानावर नाराजी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी सोशल मीडियाद्वारे माफी मागितली.
त्यानंतर बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सांगितले की, सुप्रिया सुळे यांच्याकडे नेमके असे प्रमाणपत्र आहे की नाही माहित नाही. पण पवार कुटुंबातील (Pawar Family) सर्व सदस्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे आहेत. महाराष्ट्रातील इतर बड्या कुटुंबांकडेही अशी प्रमाणपत्रे आहेत, असा दावाही हाके यांनी केला.
Laxman Hake on OBC certificates
लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, “सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही मला माहिती नाही, पण मनोज जरांगेंच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे रीतसर कुणब्याचा दाखला काढू शकतात आणि भविष्यात त्या ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष पण होऊ शकतात.”
“सगेसोयऱ्याचा त्यांचा आग्रह आहे ना? पण अजून एक सांगतो तुम्हाला, सदानंद सुळे जरी ब्राह्मण असले, तरी ब्राह्मणाचं पण कुणब्याचं सर्टिफिकेट मिळू शकतं. मोडी लिपीचं ट्रान्सलेशन करायचं आहे आणि तो दाखला घेऊन यायचा आहे, संपला विषय. त्यामुळे ब्राह्मण पण… मराठा जर ओबीसीमध्ये येऊ शकत असेल तर ब्राह्मण पण येऊ शकतो, जैन पण येऊ शकतो.” असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
“सुप्रिया सुळेंचा दाखला आहे की नाही मला माहिती नाही, पण सुप्रिया सुळे इकडून पण कुणबी म्हणजे ओबीसी होऊ शकतात आणि सदानंद सुळे यांच्याकडून पण होऊ शकतात. आता सुळेंचं मला माहिती नाही, पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे.” असे लक्ष्मण हाके यांनी ठामपणे सांगितले.
अजून कोणत्या नेत्यांकडे प्रमाणपत्र आहे असे तुम्हाला माहिती आहे? यावर लक्ष्मण हाके म्हणाले, “खूप नेते आहेत. त्यामध्ये आता मी सोलापूर जिल्ह्यातून येतो. सोलापूर जिल्ह्यातून बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पोरांकडे, विक्रम शिंदे आणि रणजित शिंदे, आमच्या पंढरपूरच्या भालकेंकडे आहे, आवताडेंकडे आहे, आमच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारांकडे आहे.”
पुढे ते म्हणाले की, “मग अहिल्यानगर जिल्ह्यातले कर्डिले असतील, गाडे असतील किंवा मग अंबादास दानवे असतील, आणखी किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला? अगदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचं सुद्धा ओबीसीचं सर्टिफिकेट आहे. पृथ्वीराज सुतार असतील किंवा अजून कोणी असतील.”
“मला सांगा, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो हा. या सामाजिक न्यायाच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामधल्या आमदार, खासदार, मंत्री पदावर ज्यांची नेहमी मक्तेदारी आहे, शेकडो वर्षांचा एक महाराष्ट्राचा गावगाडा चालवण्याचा इतिहास आणि लिटरेचर आहे, या माणसांकडे जर मागासवर्गीयांचं सर्टिफिकेट असेल, तर यांच्या स्पर्धेमध्ये हा गावगाड्यातला ओबीसी टिकेल का?” असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवातील महाप्रसादावर FDA ची नजर? तुकाराम मुंढेंनी थेटच सांगितला प्लॅन!
- ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय’; अमित ठाकरेंची जहरी टीका
- राहुल गांधी सनातन विरोधी! कंगनाचा बुरख्यावरून थेट सवाल, रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











