प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर: छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, रात्रगस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या २ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास किराडपुरा चौकातील डीपीजवळ हा खळबळजनक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाचा पाठलाग केला. हा तरुण एका पत्र्याच्या कंपाउंड शेडमध्ये जाऊन लपला. यावेळी पोलिसांनी त्याला आपले ओळखपत्र दाखवून आपण पोलीस असल्याचे स्पष्ट केले.
पोलिसांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतरही संबंधित संशयित आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींनी मिळून पोलिसांवर लोखंडी रॉडसारखी वस्तू, लाकडी दांडा आणि दगडांनी जोरदार हल्ला केला.
या गंभीर प्रकारानंतर पोलीस हवालदार संजय गावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी पहाटे जिन्सी पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमुळे शहरातील पोलिसांच्या सुरक्षिततेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- डिलिमिटेशन बिलावरून ‘इंडिया’ आघाडीत फूट; शरद पवारांच्या भूमिकेवर नाना पटोलेंचे मोठे विधान
- न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून आकाश दीप बाहेर; प्रसिद्ध कृष्णाची ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ म्हणून संघात एन्ट्री
- AUS vs ENG ४था टी-२० सामना: सिडनीमध्ये मालिका वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात, खेळपट्टी आणि हवामानाचा अहवाल








