पैठण, किरण काळे पाटील: तुळजापूर शिवारात गोदावरी नदीकाठी अवैध वाळू वाहतुकीविरोधात पैठण पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत पासिंग क्रमांक नसलेले 5 भारत बेंझ हायवा जप्त केले आहेत. या कारवाईत वाहने आणि अंदाजे 10 ब्रास वाळूसह एकूण 1 कोटी 50 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल समोर आला असून, 5 चालकांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण पोलीस ठाण्याचे नवगाव बीट अंमलदार पोलीस हवालदार राजेंद्र पोपट जिवडे (वय 37, बक्कल क्र. 1449) यांनी सरकारतर्फे दिलेल्या लेखी फिर्यादीवरून 27 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.03 वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक 0439/2026 (ठाणे दैनंदिनी नोंद क्र. 005) नोंदवण्यात आला. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 चे कलम 303(2), 62 आणि खाण व खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम 1957 चे कलम 21(1) व 21(2) लावण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव बब्रुवान गोमारे करत आहेत.
गोदावरी नदीपात्रातील वाळूचोरीवर पैठण पोलिसांचा छापा
एफआयआरमधील माहितीनुसार, हवालदार जिवडे आणि पोलीस अंमलदार चव्हाण (बक्कल क्र. 523) हे 26 नोव्हेंबर रोजी रात्री 10.59 वाजता (नोंद क्र. 18) पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी गस्तीवर निघाले होते. आपेगाव परिसरात असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून मौजे तुळजापूर शिवारात गोदावरी नदीकाठावरून काही हायवा वाहने चोरटी विक्री करण्यासाठी वाळू घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
वरिष्ठांच्या आदेशानुसार जिवडे यांनी पोलीस उपनिरीक्षक यादव, पोलीस हवालदार पुरी (बक्कल क्र. 1069), पोलीस अंमलदार दुबाले (बक्कल क्र. 112) आणि पाटेकर (बक्कल क्र. 938) यांना घटनास्थळी बोलावून घेतले. सोबत 2 पंचांची संमती घेऊन पोलीस पथक सरकारी वाहनाने 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 वाजता पोलीस ठाण्यापासून पूर्व दिशेस 15 किमी अंतरावर असलेल्या तुळजापूर शिवारातील गोदावरी नदीकडे जाणाऱ्या मायनर तीन चारी रस्त्यावर पोहोचले.
तिथे पिवळ्या रंगाची कॅबिन आणि राखाडी रंगाची बॉडी असलेले 5 भारत बेंझ हायवा आणि 5 इसम पोलिसांना दिसले. त्यापैकी क्रमांक 1 आणि क्रमांक 5 च्या हायवामध्ये वाळू भरलेली होती. पोलीस जवळ येत असल्याची चाहूल लागताच दोन्ही चालकांनी पोलिसांसमक्षच रस्त्याच्या कडेला वाळू खाली करून पळून जाण्याची तयारी केली, मात्र पथकाने त्यांना जागेवरच गाठले.
पोलिसांनी उर्वरित क्रमांक 2, 3 आणि 4 च्या हायवा वाहनांची पाहणी केली असता ती रिकामी आढळली. या तिन्ही चालकांकडे विचारणा केली असता गोदावरी नदीतील वाळू भरून चोरटी वाहतूक करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे. पाहणीदरम्यान पाचही भारत बेंझ हायवा वाहनांवर पासिंग क्रमांक नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी अकतर अफसर शेख (वय 36, व्यवसाय ड्रायव्हर, रा. भांबेरी, ता. अंबड), रामेश्वर दत्ता पाचुंदे (वय 37, रा. गुंडेवाडी, ता. अंबड, जि. जालना), प्रविण शांताराम बोळे (वय 28, रा. मुकुंदवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर), समीर सुभाण शेख (वय 28, रा. चन्नापुरी, ता. अंबड, जि. जालना) आणि सलमान समीद पठाण (वय 29, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मुद्देमालात प्रत्येकी 30 लाख रुपये अंदाजे किमतीचे जुने वापरते 5 बिनानंबरचे भारत बेंझ हायवा (एकूण 1 कोटी 50 लाख रुपये) यांचा समावेश आहे. तसेच अकतर शेख आणि सलमान पठाण यांनी मायनर तीन रस्त्याच्या बाजूला जमिनीवर खाली केलेली प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीची अंदाजे 5 ब्रासप्रमाणे एकूण 10 ब्रास वाळू (50 हजार रुपये) आढळली. एकूण 1 कोटी 50 लाख 50 हजार रुपयांच्या या मुद्देमालापैकी पाचही हायवा वाहने 2 पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून पैठण पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आली आहेत.








