बिडकीन | किरण काळे पाटील: ज्या सख्ख्या मोठ्या भावाचा आयुष्यभर आधार असायला हवा, त्याच भावाच्या हातून २६ वर्षीय लहान भावाचा अंत झाल्याची मन सुन्न करणारी घटना पैठण तालुक्यातील खाम जळगाव येथे घडली आहे. नेहमी दारू पिऊन स्वतःला आणि आई-वडिलांना केल्या जाणाऱ्या शिवीगाळीला कंटाळून मोठ्या भावानेच लहान भावाला लाकडी दांड्याने मारहाण करून जिवे ठार मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी आलेल्या राजकीय दबावाला भीक न घालता छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत या खुनाचा उलगडा केला.
श्रीराम कान्हू एरंडे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा सख्खा मोठा भाऊ नवनाथ कान्हू एरंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्यापूर्वी खाम जळगाव शिवारातील गट क्रमांक ७३ मध्ये राहत्या घरासमोरीलच शेतात एक तरुण मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आर. एम. तडवी आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीत तो मृतदेह श्रीराम कान्हू एरंडे याचाच असल्याची खात्री झाली आणि त्याच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
राजकीय दबावाला न जुमानता पोलिसांची ठाम भूमिका
मृतदेहावरील जखमा पाहता हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. मात्र, या प्रकरणात कोणाचीही तक्रार नाही, त्यामुळे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) आणि कोणतीही कारवाई करू नका, यासाठी पैठण तालुक्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीसह एका जिल्हा परिषद सदस्याकडून पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
असे असतानाही कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस निरीक्षक आर. एम. तडवी, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडत कायदेशीर प्रक्रियेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी दवाखान्यात पाठवला.
शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्रीरामचा मृत्यू शरीरावरील अनेक जखमांमुळे झाल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी मारहाण करून श्रीरामला जिवे ठार मारल्याबाबत स्वतः पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक आर. एम. तडवी यांनी हाती घेतला.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी मयत श्रीरामचा सख्खा मोठा भाऊ नवनाथ कान्हू एरंडे याच्याकडे विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता घरातील रोजचा वाद आणि त्या रात्रीचे कटू सत्य बाहेर आले. श्रीराम हा नेहमी दारू पिऊन नवनाथ आणि त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून त्रास देत होता.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.३० ते १०.०० वाजेदरम्यान श्रीराम पुन्हा दारू पिऊन घरी आला आणि शिवीगाळ करू लागला. त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून नवनाथने त्याला लाकडी दांड्याने डोक्यावर आणि हातापायांवर मारहाण करून जिवे ठार मारल्याची कबुली चौकशीत दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कबुलीनंतर पोलिसांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी नवनाथ कान्हू एरंडे याला अटक केली.
अटक आरोपी नवनाथ कान्हू एरंडे याला दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ज्या लाकडी दांड्याने त्याने भाऊ श्रीराम याला मारहाण करून जिवे ठार मारले, तो लाकडी दांडा आरोपीने पंचासमक्ष काढून दिल्याने पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आर. एम. तडवी, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप धनेधर (बक्कल क्र. ५२२), अमोल मगर (बक्कल क्र. ७६१), राजू चव्हाण (बक्कल क्र. १६३६) आणि पोलीस अंमलदार सतीश साळवे (बक्कल क्र. ८०५) यांनी सहभाग घेतला.








