प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या आणि पक्षांतर्गत धुसफुसीच्या चर्चा सुरू असतानाच, पक्षाच्या महिला आघाडीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
पक्षाच्या अधिकृत परिपत्रकानुसार, ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (NMC) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, राज्य मुंबई महिला अध्यक्ष (NMC) पदी संगीता वाझे यांची निवड झाली आहे. या नियुक्त्या पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या आहेत.
या निवडीबाबत पक्षाने अधिकृत माहिती दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत, महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी या नव्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी ‘शेतकरी न्याय हक्क मोर्चा’चे आयोजन केले असून त्यात पक्षाचे चिन्ह आणि झेंडा न वापरल्याने ते ‘एकला चलो’ची भूमिका घेत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या आंदोलनाला कोणतेही राजकीय वळण लागू नये म्हणूनच आपण पक्षाचा झेंडा वापरत नसल्याचे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले आहे.








