शरद पवारांचं वर्क फ्रॉम हॉस्पिटल; जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल भेटीला, राजकीय हालचालींना वेग

शरद पवार यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Published On: 

Sharad Pawar providing financial help to drought affected Tulshi village

प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर: शरद पवार यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने गुरुवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र त्यानंतरही शरद पवार कामात सक्रिय आहेत. रुग्णालयात जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या भेटीला हजेरी लावल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाची बैठक अर्ध्यात सोडली आणि त्या रुग्णालयात पोहोचल्या. सुळे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे.” तसेच काळजी व्यक्त करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

आमदार रोहित पवार यांनीही ‘एक्स’वर माहिती देत सांगितले की, “सुप्रियाताई प्रत्यक्ष साहेबांना भेटून पुन्हा बैठकीसाठी येत आहेत. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील 2 दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू राहतील. त्यामुळे साहेबांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये.” दरम्यान, सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे देखील रुग्णालयात पोहोचले आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल हेही रुग्णालयात दाखल झाले. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय चर्चा फेटाळून लावल्या. पटेल म्हणाले, “योगायोगाने माझ्या मुलीच्या सासूबाईंवरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साहेब दाखल झाल्याचे समजल्यावर मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो. मी भेटलो तेव्हा ते जेवण करत होते. त्यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.”

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला शरद पवार रुग्णालयात असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याआधी पटेल यांनी अमित शहा यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करत, “तुम्ही आता विश्रांती करा. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू,” असे शरद पवार यांना सांगितले होते.

काल रुग्णालयात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, तर दुसरीकडे रोहित पवार बैठकीत थांबले होते. याचवेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्यात आली. या सर्व घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा मोठा भूकंप येणार की राष्ट्रवादीच्या एकजुटीचा नवा प्रयोग पाहायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही