प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. शरद पवार हे दाऊद इब्राहीमचे दोस्त आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये बुधवारी आयोजित ‘संविधान सन्मान महासभेत’ ते बोलत होते. राजकीय पक्षांच्या नेत्यांना गुलाम केले असल्याने हा मुद्दा कम्युनिस्ट किंवा महाविकास आघाडी उचलणार नाही, असेही ते म्हणाले.
या सभेत आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवरही जोरदार टीका केली. राफेल विमानांच्या संख्येवरून त्यांनी सरकारला जाब विचारला. खरेदी केलेली विमाने ३६ आहेत की इंटरनॅशनल एअर फोर्स मॅगझिननुसार ३२ आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, १९७१ मध्ये ज्या बांगलादेशासाठी भारतीय जवानांनी रक्त सांडले आणि ५० लाख ते २ कोटी लोकांना अन्नधान्य पुरवले, त्या देशासोबतही आता आपले संबंध चांगले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सनातन्यांना उद्देशून बोलताना त्यांनी आणखी एक मोठा आरोप केला. श्रीलंकेत राम माधव यांची आणि पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर यंत्रणेची भेट झाली की नाही, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. हा प्रश्न विचारण्याची हिंमत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात नसल्याची टीकाही त्यांनी केली. भारताला मिळालेले राजकीय स्थैर्य हे संविधानामुळेच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
याच सभेत वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानवर नाव न घेता निशाणा साधला. या ठिकाणी विचारवंतांच्या बैठकीत बाळासाहेब आंबेडकर हे भाजपची बी टीम असल्याचा खोटा प्रचार करण्याचा ठराव पास केला जातो, असा दावा त्यांनी केला. आंबेडकरी चळवळीने मांडलेले मुद्दे दुर्लक्षित केले जातात, मात्र तेच मुद्दे राहुल गांधींनी मांडल्यास त्याचे कौतुक केले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. २५ डिसेंबर १९२७ रोजी बाबासाहेबांच्या विचारांनी मनुस्मृतीचे जोखड फेकून दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.








