प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. राज्यात एका बाजूला थंडीचा कडाका जाणवत आहे, तर दुसरीकडे उकाडाही वाढला आहे. सकाळी आणि रात्री थंडी, तर दुपारी उकाडा अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानात मोठी घसरण होत आहे. २६ नोव्हेंबर रोजी कमाल आणि किमान तापमानात चढउतार पाहायला मिळेल. मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्यात दाखल होत असले तरी तापमानात सातत्याने बदल होत आहेत.
नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होणार आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही. मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील.
विदर्भात मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. तेथील तापमान १६ अंश ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होऊन गारठा वाढू शकतो. राज्यात कधी गारठा तर कधी उकाडा असे हवामान असल्याने प्रशासनाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.








