प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. आता ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जोडपे पुन्हा चर्चेत आले आहे. या सेलिब्रेशनला ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासह उपस्थित होती, मात्र या कौटुंबिक सोहळ्यात अभिषेक बच्चन कुठेच दिसला नाही.
वहिनी श्रीमा राय हिने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या साध्या लूकमध्ये दिसत आहे, तर आराध्याने सुंदर ड्रेस आणि डोक्यावर क्राऊन परिधान केला आहे. त्यांच्यासोबत ऐश्वर्याची आई वृंदा राय आणि कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत. श्रीमाने या फोटोंना कॅप्शन देताना म्हटले आहे की, ‘कॅमेऱ्यात कैद झालेला वाढदिवस… कृतज्ञता, फुलं, सरप्राइज, थोडी मजा आणि मुलं, सासूबाईंसोबत घालवलेली संध्याकाळ’.
ऐश्वर्या आणि आराध्या या सोहळ्याला उपस्थित असताना अभिषेकच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले. मात्र, याचदरम्यान अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे अभिषेक त्यावेळी कुठे होता हे समोर आले. श्वेताने शेअर केलेल्या या फोटोत ती स्वतः, आई जया बच्चन आणि भाऊ अभिषेक बच्चन एकत्र दिसत असून तिघांनीही पारंपरिक कपडे परिधान केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी मुंबईत मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला एकत्र हजेरी लावली होती. त्यावेळी दोघेही हातात हात घालून कार्यक्रमात पोहोचले होते. त्यांच्या एकत्रित उपस्थितीने चाहत्यांचे लक्ष वेधले होते, मात्र आता श्रीमाच्या वाढदिवसाच्या फोटोंमध्ये अभिषेक नसल्याने बच्चन कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.








