प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) ताकद लक्षणीय वाढली आहे. शिंदेंची शिवसेना, जनता दल युनायटेड (जेडीयू), तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि शिरोमणी अकाली दल यांसारख्या चार महत्त्वाच्या पक्षांनी पुन्हा एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे लोकसभेत एनडीएची सदस्यसंख्या तब्बल ४२ खासदारांनी वाढली असून, आगामी निवडणुका आणि महत्त्वपूर्ण विधेयकांसाठी सरकारला मोठे बळ प्राप्त झाले आहे.
लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे शिल्लक असली तरी भाजपने आतापासूनच आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाची एनडीएमध्ये अधिकृत एन्ट्री झाली. २०१८ मध्ये टीडीपी, २०१९ मध्ये शिवसेना आणि २०२० मध्ये शिरोमणी अकाली दलाने एनडीएची साथ सोडली होती. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे येणे-जाणे सुरूच असते, मात्र २०२४ मध्ये तेही पुन्हा एनडीएमध्ये आले. या व्यतिरिक्त आसाम गण परिषद आणि एआयएडीएमके सारख्या पक्षांनीही वेगळे झाल्यानंतर पुन्हा घरवापसी केली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजप २४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र २०१४ आणि २०१९ प्रमाणे त्यांना स्वबळावर बहुमत मिळाले नव्हते. अशा वेळी १६ खासदार असलेली टीडीपी, १२ खासदार असलेली जेडीयू आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले आणि बहुमताचा आकडा गाठता आला. २०२४ च्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला केवळ ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र जून २०२६ मध्ये त्यांना आणखी ६ खासदारांचे समर्थन मिळाल्याने हा आकडा १३ वर गेला. संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे खासदार शिंदेंच्या नेतृत्वात आले आहेत.
दरम्यान, १५ डिसेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना १५ डिसेंबरपूर्वी अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्याचा सल्ला दिला असून, मंत्री आणि खासदारांना देशाबाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच अधिवेशनात परिसीमनशी संबंधित महिला विधेयक येण्याची शक्यता असून, त्यासाठी सरकारला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे.
सध्या एनडिएकडे ३२० सदस्यांचे बळ आहे. खालच्या सभागृहात ३ जागा रिक्त असून एकूण सदस्यसंख्या ५४० आहे. त्यामुळे दोन तृतीयांश बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी ३६१ सदस्यांची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती पाहता, हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला विरोधकांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.








