अजितदादा महायुतीत का आले? अमित शाहांनी अखेर उलगडलं ‘ते’ सीक्रेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना दादांच्या महायुतीतील प्रवेशाचे सीक्रेट आणि त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

Published On: 

Amit Shah speaking about late Ajit Pawar

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत प्रवेश का केला, याचे खरे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उघड केले आहे. आज पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी अजितदादांच्या महायुतीतील प्रवेशाचा सस्पेन्स संपवला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अजित पवार यांनी घेतलेल्या या धक्कादायक निर्णयाबद्दल शाह यांनी एक किस्सा सांगितला. जेव्हा अजितदादांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शाह यांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी दादांना विचारले होते की, तुमची एक वेगळी पार्श्वभूमी आहे. सत्ता तर येते आणि जाते, मग जनतेला धक्का देणारा एवढा मोठा निर्णय तुम्ही का घेत आहात? यावर अजितदादांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले होते. प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास आणि महायुती यांना वेगळे करता येणार नाही. मला स्वतःला महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाशी जोडून घ्यायचे असल्याने मी महायुतीचे सदस्यत्व स्वीकारत असल्याचे दादांनी स्पष्ट केल्याचे शाह यांनी सांगितले.

अजितदादांचा महायुतीत येण्याचा निर्णय थोडा उशिरा झाला. तत्पूर्वी त्यांचे दोन-तीन प्रयत्न अयशस्वी ठरले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग बनली. त्यानंतर शाह आणि दादांची घट्ट मैत्री झाली. विधानसभा निवडणुकीत दादांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत संयमाने युक्तिवाद केला होता. मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही कार्यकर्त्यांसोबतच्या नात्याचा विचार करणारा हा दादांचा मोठा गुण असल्याचे शाह यांनी नमूद केले. त्यांच्या प्रवेशामुळे महायुतीला स्थिरता व निरंतरता मिळाली आणि सरकारला कठोर निर्णय घेणे शक्य झाले.

यावेळी शाह यांनी अजितदादांच्या आकस्मिक निधनाबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी या भीषण दुर्घटनेची माहिती दिली. जखमींचे वाचण्याची शक्यता कमी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. रुग्णालयाच्या संपर्कात असलेल्या फडणवीस यांच्याकडून अवघ्या दोन तासांतच दादांच्या मृत्यूची बातमी आली. या विचित्र अपघाताने केवळ मनालाच नव्हे, तर शरीर आणि हृदयालाही मोठा धक्का बसल्याची भावना शाह यांनी व्यक्त केली. असा नेता अशा दुर्घटनेत जाईल असे वाटले नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

वेळेआधीच एका कर्तृत्ववान माणसाची एक्झिट ही फार मोठी हानी असल्याचे शाह म्हणाले. संवेदनशीलता, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती तसेच वेळेचे पालन करण्याची त्यांची सवय राजकारणातील तरुण पिढीसाठी कायम आदर्शवत ठरेल, असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही