सोलापूर, 18 नोव्हेंबर: श्री क्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात भाविकांना प्रसादासाठी विकल्या जाणाऱ्या मिठाईवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. सोलापूरच्या झोन-१ पथकाने पेढा उत्पादक आणि विक्रेत्यांवर केलेल्या या धडक कारवाईत अडीच लाख रुपये किमतीचा तब्बल साडेआठशे किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे.
राज्यभरातून स्वामींच्या दर्शनाला येणारे लाखो भाविक प्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर कंदी पेढे आणि हलवा खरेदी करत असतात. या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने मंदिर परिसरातील प्रसाद आणि पेढे विकणाऱ्या १२ दुकानांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता न केल्याचे तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
या मोहिमेअंतर्गत अक्कलकोटमधील मुख्य मिठाई पुरवठादार असणाऱ्या ‘रंगोली स्वीट मार्ट’वरही छापा टाकण्यात आला. गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्याने प्रशासनाने चार आस्थापनांना आपला व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, मुख्य पुरवठादार असलेल्या आस्थापनेचा अन्न परवानाही निलंबित करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एफडीएकडून भेसळखोरांवर जोरदार कारवाई सुरू आहे. अक्कलकोटमध्ये कंदी पेढे आणि हलव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याच्या या ताज्या कारवाईमुळे स्थानिक उत्पादक व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या विमान दुर्घटनेला रोहित पवारांच्या कारखान्याचा धूर जबाबदार? भाजपचा गंभीर आरोप
- Winter Health Care: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बाजरी, गूळ, तुपासह आहारात करा ‘हे’ बदल
- अर्णब, मुरासूनंतर आता ‘अकवान’ चक्रीवादळाचे संकट; विदर्भासह ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा








