प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्च येथे २७ नोव्हेंबरपासून दुसरी आणि अंतिम कसोटी सुरू होत आहे. या सामन्यापूर्वी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भक्कम पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत दोन सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या कंबोजला गोलंदाजीत मोठा प्रभाव पाडता आलेला नाही. मात्र, त्याच्या लाल चेंडूवरील कामगिरीबाबत इतक्या लवकर मत बनवणे घाईचे ठरेल, असे मॉर्केल यांनी म्हटले आहे.
अंशुल कंबोजने गेल्या वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्याने १८ षटकांत ८९ धावा देऊन केवळ १ बळी मिळवला होता. वेलिंग्टन कसोटीत मात्र त्याने सुधारणा दाखवत नव्या चेंडूवर लवकर बळी मिळवला आणि नाईटवॉचमन म्हणून ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या दिवशीही त्याने चांगली गोलंदाजी केली, परंतु संथ खेळपट्टीमुळे भारतीय गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला.
वेलिंग्टनच्या खेळपट्टीने सामन्यात खूप लवकर वेग गमावल्याचे मॉर्केल यांनी स्पष्ट केले. क्रिकबझच्या हवाल्याने सामन्यपूर्व पत्रकार परिषदेत बोलताना मॉर्केल म्हणाले, “केवळ तोच नाही, न्यूझीलंडच्या बाजूनेही पाहा, त्या खेळपट्टीवर वेगाचा अभाव होता. पदार्पणाच्या कसोटीवरून तुम्ही कोणाचीही परीक्षा घेऊ शकत नाही. पहिल्या कसोटी सामन्यात अनेक भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे संघासाठी कठीण षटके टाकणाऱ्या या खेळाडूला आपण पाठिंबा देऊया. त्याला काही सामने खेळू द्या आणि मग आपण चर्चा करू. या टप्प्यावर एखाद्या खेळाडूबद्दल मत बनवणे खूप घाईचे ठरेल.”
चालू जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) चक्रात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असूनही मोहम्मद सिराजला वेलिंग्टन कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. या निर्णयावरही मॉर्केल यांनी स्पष्ट भाष्य केले. सिराज हा आजही जागतिक दर्जाचा गोलंदाज असल्याचे सांगत ते म्हणाले, “माझ्या मते तो चांगली गोलंदाजी करत आहे. तो सध्या ज्या टप्प्यातून जात आहे, ते पाहता तो माझ्यासाठी जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. कधीकधी निवडीचे निर्णय घेणे सोपे नसते. मी त्याला सांगितले की, सध्या आपण कुठे आहोत आणि काय सुधारणा करायची आहे यावर लक्ष केंद्रित करूया. निवडीवर आपले नियंत्रण नसते, त्यामुळे स्वतःची जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे आहे.”
वेलिंग्टनमध्ये शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला सर्वबाद करण्यात भारताला अपयश आले. याला मॉर्केल यांनी खेळपट्टीच्या बदलत्या स्वरूपाला जबाबदार धरले. ख्राईस्टचर्च कसोटीबाबत बोलताना मॉर्केल म्हणाले की, भारतीय गोलंदाजांनी नवीन कुकाबुरा चेंडूचा अधिक चांगला वापर करणे आवश्यक आहे. सुरुवातीला काही धावा गेल्या तरी त्यांनी आक्रमक टप्प्यावर गोलंदाजी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“जेव्हा चेंडू मऊ होतो आणि खेळपट्टीचा वेग कमी होतो, तेव्हा जीवन आणखी कठीण होते. त्यामुळे तुम्हाला नव्या चेंडूचा योग्य फायदा घ्यावा लागेल आणि गोलंदाजीत थोडं धाडस दाखवावं लागेल,” असे मॉर्केल यांनी स्पष्ट केले. भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांच्या उपलब्धतेबाबत माहिती देताना मॉर्केल म्हणाले, “सर्व गोलंदाज तंदुरुस्त असून निवडीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही उद्या याबाबत अंतिम निर्णय घेऊ.”








