नागपूर, २७ नोव्हेंबर: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “माझ्यासाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे, मला अटक करून जेलची भीती दाखवू नका,” असे थेट आव्हान दिपके यांनी दिले. नागपूर येथील संविधान चौकात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाही बचाव, संविधान बचाव’ रॅलीत ते बोलत होते.
संविधान दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर २०२६) आयोजित या रॅलीत बोलताना दिपके म्हणाले की, सरकार आंदोलनाला कितीही विरोध करत असले तरी आम्ही मागे हटणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक चहावाला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसू शकला, अन्यथा ते चहाच्याच टपरीवर असते. संविधानासमोर सर्व धर्म, जाती आणि श्रीमंत-गरीब समान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “आम्ही १० ऑक्टोबरला दिल्लीत जाण्याची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण दिल्लीत बॅरिकेड्स लावले, ट्रेन आणि इंटरनेट बंद केले, तसेच १० हजारांवर लोकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतर ज्ञानेश कुमार यांना आपले ६ निर्णय मागे घ्यावे लागले,” असा टोला दिपके यांनी लगावला.
स्वतःसह आशुतोष आणि सौरभ यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढल्याचे सांगत दिपके यांनी पोलिसांना आव्हान दिले. “मी आज नागपूरच्या संविधान चौकात आहे, काय करणार, अटक करणार? यापूर्वी २ वेळा अटक केली, आता तिसऱ्यांदा करणार. जेलची भीती दाखवून तुम्ही १२ वर्षांत देशाची वाट लावली आहे. येत्या २ वर्षांत जनता काय असते ते तुम्हाला दाखवेल,” असा घणाघात त्यांनी केला.
“आम्हाला आत टाकले तरी तुम्ही शांत बसायचे नाही, लोकशाही वाचवण्यासाठी लढत राहायचे. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार संघटित व्हा आणि संघर्ष करा. मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.








