प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: दिवाळीपूर्वी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेली कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याच्या चर्चेवर आता पक्षाकडून मौन सोडण्यात आले आहे. सीजेपीचे आशुतोष रांका यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी सीजेपीची ठाम भूमिका होती. मात्र, दिवाळीच्या काळात शांत राहणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी आधीच स्पष्ट केले होते. आता सण संपल्यानंतरही दीपके यांच्यासह सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर ज्ञानेश कुमार यांचा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे सीजेपीचे हे आंदोलन संपले का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
सध्या ही संघटना पुन्हा एकदा ‘स्कूल ठीक करो’ अभियानात सक्रिय झाली आहे. याबाबत सांगण्यात आले आहे की, ‘आम्ही स्कूल ठीक करो अभियान पुन्हा एकदा सुरू केले असून, संघटनात्मक बांधणीवर लक्ष देत आहोत. आयुष्यभर तुम्ही केवळ आंदोलनाच्याच मोडमध्ये राहू शकत नाही. तुम्हाला हे सुरू ठेवायचे असेल तर संघटनेची आवश्यकता लागणार.’
सीजेपीला आता सीईसी (CEC) चा राजीनामा नको आहे का? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न सहसंस्थापक आशुतोष रांका यांनी वरिष्ठ पत्रकार अजित अंजुम यांच्या यूट्यूब चॅनेलवर दिला. पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन कधी करणार, याचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र, ‘देशात थंडी आली असली तरी आम्ही थंड पडणार नाही,’ असे ते म्हणाले.
रांका यांनी आपल्या दौऱ्यांबद्दल सांगितले की, ‘काल परवा मी हरियानाच्या दौऱ्यावर होतो, सौरभ दिल्ली दौऱ्यावर होता आणि काल त्याने यूपीतील शाळांचा दौरा केला. दीपके कोचीच्या दौऱ्यावरून परतला आहे. आम्ही जमिनीवरच असून एकाच वेळी दोन-तीन विषयांवर आमचे लक्ष आहे. आमच्याकडे एसआयआर (SIR) चा मुद्दाही आहे. आम्ही जिथे जातोय, तिथे जाऊन लोकांचा मताधिकार त्यांच्याकडून कसा हिरावला गेला, हे समजून घेत आहोत.’ बऱ्याच काळानंतर कुटुंबासोबत वेळ घालवत दिवाळी साजरी करून पुन्हा जमिनीवर उतरल्याचेही रांका यांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आता गरज उरलेली नाही का? या प्रश्नावर रांका म्हणाले, ‘त्या लॉजिकने तर संपूर्ण देशच थंड पडला आहे. मग थंड पडण्याचा हा प्रश्न फक्त सीजेपीलाच का विचारला जातोय? सीजेपी सतत रस्त्यावर आंदोलनात उतरली, आम्हाला ताब्यात घेतले गेले, अटक झाली आणि दिवाळीच्या एक दिवस आधी कोचीमध्ये सभाही झाली. आता यानंतर आम्ही हरियाना, दिल्ली, यूपी आणि पाटणा अशा अनेक ठिकाणी जाणार आहोत.’
१५ दिवसांच्या विश्रांतीचे समर्थन करताना रांका शेवटी म्हणाले, ‘आम्ही आमच्या पातळीवर काम करत आहोत. मध्ये १५ दिवसांचा ब्रेक घेतला, त्यावर प्रश्न विचारले जात आहेत की सीजेपीमध्ये सन्नाटा का आहे? १५ दिवसांपासून इतर सर्वजणही शांतच आहेत. आमची कोणाशीही तुलना किंवा स्पर्धा नाही. जर सर्वच पक्ष आणि संघटनांनी १५ दिवसांचा ब्रेक घेतला, तर मग प्रश्न फक्त सीजेपीलाच का विचारला जातोय?’
📌 महत्वाच्या बातम्या
- राजस्थानमधील पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय, बॅलेट पेपरवर भाजपला धक्का
- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावत ऋषभ पंतने रचला विश्वविक्रम
- सलाईनमधून इंजेक्शन दिल्यानंतर १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांचे रुग्णालयावर गंभीर आरोप








