खासदार-आमदार एकाच घरात, तरीही गावातील आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था; भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आरोग्यमंत्र्यांची झाडाझडती!

पाचोडच्या ट्रॉमा सेंटरमधील यंत्रसामग्री बंद; पन्नास खाटांच्या रुग्णालयासाठी मंत्रालयात विलास भुमरेंच्या बैठका, मात्र अस्तित्वात असलेल्या सुविधांकडे कोणाचे लक्ष?

Published On: 

Pachod Rural Hospital: Maharashtra Health Minister Prakash Abitkar inspecting the trauma care unit and interacting with patients in Paithan

पैठण, 28 नोव्हेंबर (मनोज जाधव) : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) रात्री पाचोड येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली असता, ट्रॉमा केअर सेंटरमधील काही महत्त्वाची यंत्रसामग्री बंद अवस्थेत आढळली. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या गृहगावातील रुग्णालयाची ही अवस्था पाहून आरोग्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘आरोग्य संवाद यात्रे’च्या निमित्ताने आबिटकर रात्री 9 वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहोचले. त्यांनी विविध विभाग, औषधसाठा, उपचार व्यवस्था आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ट्रॉमा सेंटरमधील बंद यंत्रसामग्रीबाबत त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल पवार यांच्याकडे विचारणा केली, तसेच आवश्यक सुविधांसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान आबिटकर यांनी केवळ अधिकाऱ्यांच्या माहितीवर विसंबून न राहता दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी थेट संवाद साधला. औषधांची उपलब्धता, डॉक्टरांची उपस्थिती आणि उपचारांदरम्यान येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचीही विचारपूस करत रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले.

विस्ताराच्या बैठका मंत्रालयात, प्रत्यक्षात यंत्रे बंद

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पैठण आणि पाचोड येथील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात मंत्रालयात आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यात पैठण येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, तर पाचोड येथे 50 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानंतर अवघ्या 14 दिवसांपूर्वी, 13 नोव्हेंबरला राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा संचालक संजय काटकर यांनी पाचोड रुग्णालय आणि ट्रॉमा केअर युनिटला भेट देऊन 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धनासाठी आवश्यक जागेची पाहणी केली होती. मात्र, नव्या विस्ताराच्या बैठका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे सुरू असतानाच अस्तित्वात असलेल्या रुग्णालयातील यंत्रसामग्री बंद आढळली. ही उपकरणे नेमकी किती दिवसांपासून बंद आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणत्या स्तरावर पाठपुरावा झाला, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही.

21 हजारांहून अधिक रुग्णांचा भार

पाचोड हे राष्ट्रीय महामार्गावरील आणि तीन जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेले महत्त्वाचे ठिकाण असल्याने परिसरातील अनेक गावांतील नागरिक या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत बाह्यरुग्ण विभागात तब्बल 21,360 रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णालयावरील वाढता ताण आणि महामार्गावरील अपघातांचे प्रमाण पाहता ट्रॉमा सेंटरमधील यंत्रसामग्री बंद असण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे.

तीन दशकांचे वर्चस्व अन् गृहगावातील वास्तव

गेल्या तीन दशकांपासून पैठणच्या राजकारणावर प्रभाव असलेले पाचोड हे भुमरे कुटुंबाची राजकीय कर्मभूमी आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 अशा पाच विधानसभा निवडणुका जिंकत राज्याचे मंत्रिपद व पालकमंत्रिपद भूषवले. 2024 मध्ये ते लोकसभेत निवडून गेल्यानंतर त्यांचे पुत्र विलास भुमरे यांनी पैठणचे प्रतिनिधित्व स्वीकारले. गेल्या काही दिवसांत पाचोड परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, केंद्रात खासदार आणि राज्यात आमदार अशी राजकीय ताकद असूनही गृहगावातील रुग्णालयातील त्रुटी समोर आल्या आहेत.

2024 मध्ये आमदार विलास भुमरे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती. राज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा व्यक्त होत असतानाच, स्वतःच्या मतदारसंघातील आणि गृहगावातील मूलभूत आरोग्य सुविधा सक्षम करण्याला किती प्राधान्य दिले जाते, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरतो. रुग्णालयाच्या दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी आरोग्य विभागाची असली, तरी सुविधांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे ही लोकप्रतिनिधींचीही जबाबदारी आहे.

आरोग्यमंत्र्यांची ही भेट राजकीय हेतूने झाली असल्याचे सांगण्यास सध्या कोणताही ठोस आधार नाही. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या प्रभावशाली लोकप्रतिनिधींच्या गृहगावातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांच्या पाहणीत उघड होणे, ही बाब राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित करता येणार नाही. नव्या रुग्णालयाच्या प्रस्तावापेक्षा सध्याच्या रुग्णालयात रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळणे ही आजची खरी गरज आहे. आता आरोग्यमंत्र्यांच्या सूचनांनंतर बंद यंत्रसामग्री किती दिवसांत सुरू होते आणि त्यासाठी खासदार व आमदार कोणती ठोस पावले उचलतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही