अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की; हायवा मालक व चालकावर गुन्हा

पैठणच्या विहामांडवा येथे अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचोड पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Published On: 

पैठण | किरण काळे पाटील: तालुक्यातील विहामांडवा बाजार समिती जवळ अवैध मुरूम वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी ओमप्रकाश महादेव चाटे (वय ४९) यांच्या फिर्यादीवरून हायवा मालक नवाज रहीमखाँ पठाण आणि चालक नवाज बाबा सय्यद (दोघे रा. विहामांडवा, ता. पैठण) यांच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीनुसार, ओमप्रकाश चाटे हे सजा हिरडपुरीचे ग्राम महसूल अधिकारी असून त्यांच्याकडे सजा विहामांडवाचा अतिरिक्त पदभार आहे. गुरुवारी दुपारी विहामांडवा बाजार समिती जवळील मेन रोडवरून मुरमाने भरलेला विनाक्रमांकाचा मिनी हायवा जाताना त्यांना दिसला. त्यांनी हात दाखवून वाहन थांबवले आणि चालकाचे नाव विचारले असता त्याने नवाज बाबा सय्यद असे सांगितले.

त्याच वेळी पाठीमागून चारचाकी वाहनातून हायवा मालक नवाज रहीमखाँ पठाण घटनास्थळी आला. चाटे यांनी मुरूम वाहतुकीच्या परवानगीबाबत (रॉयल्टी) विचारणा केली असता, पठाण याने परवानगी नसल्याचे सांगून त्यांना धक्काबुक्की केली. चाटे डाव्या पायाने दिव्यांग असल्याने या धक्काबुक्कीमुळे ते खाली पडले.

त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत “तू इथे नोकरी कशी करतो” असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली आणि सहा हजार रुपये किमतीचा दोन ब्रास मुरूम भरलेला हायवा केकतजळगाव रोडने चोरून नेला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर चाटे यांनी विहामांडवा सर्कलच्या वरिष्ठ मंडळ अधिकारी विमल बाबासाहेब बांगर यांना फोनवरून माहिती दिली. त्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, मात्र तोपर्यंत आरोपी हायवा घेऊन निघून गेला होता. त्यानंतर चाटे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दाखल केली.

या फिर्यादीवरून पाचोड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धक्काबुक्की, शिवीगाळ, धमकी आणि मुरूम चोरीप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १३२, १२१(१), ३०३(२), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम, १९५७ चे कलम २१, २१(१) आणि २१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोकराव नाईकवाडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही