प्रतिनिधी, 22 नोव्हेंबर: ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान चीनने पाकिस्तानला नेमकी का मदत केली, यामागचे मुख्य कारण आता अमेरिकेच्या एका अहवालातून उघड झाले आहे. भारताची वाढणारी लष्करी, आर्थिक आणि जागतिक ताकद चीनसाठी मोठे आव्हान बनत असून, भारताला रोखण्यासाठीच चीन पाकिस्तानला बळ देत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘यूएस-चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशन’ने १८ नोव्हेंबर रोजी ‘२०२६ रिपोर्ट टू काँग्रेस’ प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, भारत हा चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देऊ शकणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, सर्वात मोठी लोकशाही आणि अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून भारताची ओळख या अहवालात अधोरेखित केली आहे. तसेच, जगातील सर्वात मोठ्या सैन्यदलांपैकी एक सैन्य भारताकडे असून चीनसोबतची २,१०० मैलांची वादग्रस्त सीमा भविष्यातील सत्तास्पर्धेवर परिणाम करू शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे.
मे २०२५ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख या अहवालात आहे. या कारवाईवेळी चीन थेट युद्धात न उतरता पाकिस्तानला पडद्यामागून मदत करत होता. पाकिस्तानला चिनी बनावटीची अद्ययावत शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली होती. तसेच चिनी तज्ज्ञांनी पाकिस्तानात राहून तांत्रिक साहाय्य केल्याचेही अहवालाने स्पष्ट केले आहे. चीन आणि पाकिस्तानमधील ही वाढती लष्करी जवळीक भारतासाठी दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका वाढवणारी असल्याचे निरीक्षण यात नोंदवण्यात आले आहे.
भारताचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी चीन केवळ सीमेवरच नव्हे, तर लष्करी, आर्थिक आणि सागरी क्षेत्रातही दबाव आणत आहे. भारताला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या औद्योगिक वस्तू, तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या पुरवठ्यावर चीनने निर्बंध लादले आहेत, जेणेकरून भारताच्या आर्थिक व सामरिक प्रगतीला खीळ बसू शकेल.
या अहवालात २०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षाचा संदर्भही देण्यात आला आहे. या घटनेनंतर भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. २०२४ पासून हे संबंध सुधारण्याचे दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू असले, तरी चीनकडून पाकिस्तानला सातत्याने मिळणाऱ्या लष्करी पाठबळामुळे भारताच्या चिंता अजूनही कायम असल्याचे अमेरिकी आयोगाने स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी-२० सामन्यात पदार्पणवीर लॅचलन शॉचा हवेत झेपावत अफलातून झेल
- हॅरी ब्रूकने रायली मेरेडिथच्या एकाच षटकात कुटल्या २४ धावा; पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई
- महागड्या स्पेलनंतर जेकब ओरम यांची जेकब डफीला साथ; भारताविरुद्ध पहिल्या कसोटीतील कामगिरीवर दिली प्रतिक्रिया








