Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तोंड भरून शाहांचं कौतुक केलं होतं.
यावरून ठाकरे गटानं आता भाजप सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय? असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. डॉ. आंबेडकर याच मातीतले. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी येथे कायद्याचेच राज्य शेवटपर्यंत राहील.
पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल. फडणवीस म्हणतात की, श्री. अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो.
बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत. हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल. देशात तसेच वारे वाहत आहेत”, असं आजच्या सामना अग्रलेखात (Uddhav Thackeray) म्हटलं आहे.
Read Samana Editorial
पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. फडणवीस यांनी इतके केले. मग मुख्यमंत्री मिंधे आणि अजित पवार तरी कसे मागे राहतील?
त्यांचीही गाडी सुसाट सुटली. श्री. शहा यांचा जन्म मुंबईतला, शहा यांनी मुंबईत व्यापार केला आहे. कारखाना चालवला आहे, त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो. असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी द्यावे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही.
जे व्यापारी डोक्याचे आहेत त्यांना मुंबईचे महत्त्व माहीत असायलाच हवे. पोर्तुगीजांनी मुंबईत व्यापार केला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईस व्यापारी केंद्र बनवले. आता हे नवे शेठ मंडळ आले.
व्यापार उद्योग हे मुंबईचे वैशिष्ट्य आहेच. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबई महाराष्ट्रापासून खेचून घेण्याचे प्रयत्न झाले. मुंबई गुजरातला मिळावी अशी मूळ योजना येथील गुजराती धनिकांची होती.
ते जमले नाही तर मुंबई महाराष्ट्रालाही मिळू नये, मुंबई हा एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश व्हावा असे कारस्थान झाले, पण मराठी माणूस भडकला. त्याने मोठे आंदोलन केले व शेवटी मुंबई महाराष्ट्राच्या पदरात पडली.
हे सत्य असले तरी मुंबईचे महत्त्व कमी व्हावे, मुंबई कमजोर पडावी यासाठी हे शेठ मंडळ नेहमीच पडद्यामागून कारस्थाने करीत आले. गेल्या आठ- नऊ वर्षांत या कारस्थानांना जास्तच विष चढले आहे. कारण देशाची सूत्रे गुजरातच्या ताब्यात असून मुंबई-महाराष्ट्र कमजोर करण्याच्या डावपेचांना निरंकुश सत्तेमुळे बहार आली आहे.
महाराष्ट्रातले सध्याचे सरकार त्याच हेतूने बसवले गेले आहे व महाराष्ट्राची लूट मिधे सरकार उघडया डोळयांनी पाहत आहे. फडणवीस म्हणतात, श्री शहा यांचा जन्म मुंबईत झाला. होय, झाला असेल. या मुंबईत अनेक महान लोकांनी जन्म घेतला. राजीव गांधी यांचाही जन्म मुंबईत झाला. शहांनी महाराष्ट्रात त्यांचा
कारखाना चालवला
यात उपकार काय? मोदी-शहा यांच्या काळात महाराष्ट्रातील मोठमेठे उद्योग, कार्यालये त्यांनी हलवून गुजरातला नेली… मुंबईत जन्म घेतल्याचे असे पांग ते फेडत आहेत काय? क्रिकेट ही मुंबईची ओळख ते क्रिकेटही त्यांनी पद्धतशीरपणे गुजरातेत पळवले शहा यांना महाराष्ट्राचा पाया खतम करायचा आहे.
महाटी राज्याला गुलाम करायचे आहे. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेली शिवसेना तोडली व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तुकडे करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओवाळून टाकलेल्या भ्रष्ट लोकांची ‘मोट’ बांधली व राज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली.
सत्तेवर सर्व मिथे पण बादशाही गुजरातकडे असे जे चित्र दिसत आहे ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविणारे आहे. मिंधे मुख्यमंत्री म्हणाले, श्री. शहा हे महाराष्ट्राचे जावई आहेत मग हुंडा म्हणून ते महाराष्ट्रातील उद्योग, गुंतवणूक, मुंबईतील धनसंपत्ती गुजरातेत घेऊन चालले आहेत काय? याचे उत्तर द्या.
अजित पवार हे तर इतक्या ओशाळवाण्या पद्धतीने बोलत आहेत की, त्यांना पाठकणा आहे की नाही? असा प्रश्न पडू लागला आहे. “महाराष्ट्राचे एकमेव हितकर्ते अमित शहाच,” अशी भाषणे अजित पवार करू लागले आहेत.
आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली? मुंबईत जन्मले, महाराष्ट्राचे जावई झाले, येथे कारखाना चालवला, यात महाराष्ट्राला काय मिळाले? निदान सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या
अत्याचारांवर तरी
गृहमंत्री शहांना भूमिका घ्यायला लावा. तर त्या जावयांची ओवाळणी करू. डहाणूचे आमदार विनोद निकोलस यांनी एक गंभीर मुद्दा समोर आणला आहे. गुजरातने डहाणूच्या सीमेत घुसून दोन किलोमीटरचा भूभाग कब्जात घेतला.
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यावर काय भूमिका घेणार आहेत? अमित शहा हे मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईची लूट करीत आहेत मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे भाजपला वाटते.
त्यामुळे भाजप कोंबडीच मारून खात आहे. कारण फडणवीस म्हणतात ते खरे आहे. श्री. शहा यांना मुंबई चांगली कळते… शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना सर्व कळते, पण मणिपुरात नेमके काय घडते आहे व हिंसाचार कसा थांबवायचा ते कळत नाही हे आश्चर्यच म्हणायला हवे मुख्यमंत्री शिंद म्हणतात, शहा हे कष्टाळू आहेत.
मात्र मुंबईसह महाराष्ट्र हा महाटी माणसांच्या कष्टातून रक्तातून निर्माण झाला याचा विसर मिध्यांना पडलेला दिसतो. महाराष्ट्रात दंगली पेटाव्यात व त्यातून भाजपला राजकीय लाभ मिळावा असे एक कारस्थान रचले जात आहे. सर्वज्ञानी गृहमंत्र्यांपर्यंत ही खबर गेली असेलच. महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. डॉ आंबेडकर याच मातीतले.
त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी येथे कायद्याचेच राज्य शेवटपर्यंत राहील. पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल.
फडणवीस म्हणतात की, श्री अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो. बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत. हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल. देशात तसेच वारे वाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | नरेंद्र मोदींसोबत आज महाराष्ट्रातील NDA च्या खासदारांची बैठक
- Prakash Ambedkar | अजित पवार गेल्यावर शरद पवारांकडं काय राहिलं? – प्रकाश आंबेडकर
- Ashish Shelar | “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत…”; आशिष शेलारांनी ठाकरे गटाचे कान टोचले
- Bhalchandra Nemade | औरंगजेब हिंदु द्वेष्टा नव्हता; भालचंद्र नेमाडेंचं वादग्रस्त वक्तव्य
- Rohit Pawar | “अन्याय पद्धतीने काढलेली खासदारकी…”; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया