Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नागपूरमधील शासकीय रुग्णालयात देखील अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मोजा मारीत आहेत.
लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते. पुरोगामी महाराष्ट्राचे हे निर्दय आणि अमानुष चित्र आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील यमाचा दरबार महाराष्ट्राच्या इभ्रतीस काळिमा फासणारा आहे.
या राज्यात आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी मुबलक पैसा आहे, पण शासकीय इस्पितळात औषध खरेदीसाठी पैसे नाहीत. यमाचा रेडाही हे चित्र पाहून रडत असेल. शेमा शेमा शेमा, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
Read Samana Editorial
महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे थैमान सुरू असताना सरकार निर्दयपणे राजकारणात दंग झाले आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड येथील इस्पितळांत शंभरावर गरीब रुग्ण तडफडून मेले.
त्यात लहान बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात तर हे मृत्युसत्र सुरूच आहे. मागील २४ तासांतदेखील आणखी १४ रुग्णांचा तेथे मृत्यू झाला.
मृत्यूचे हे तांडव मुंबई हायकोर्टात पोहोचले तेव्हा मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय यांनी सरकारच्या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त केली. औषधे व डॉक्टरांची कमतरता यामुळे हे मृत्यू झाले असतील तर चिंता वाटावी असाच हा विषय असल्याचे उच्च न्यायालयाने फटकारले. इस्पितळांत औषधे नाहीत.
कारण मंत्र्यांना औषध खरेदीचे ‘होलसेल’ अधिकार त्यांच्या हातात हवे आहेत. त्यातून मोठे कमिशन मिळते. औषध खरेदीच्या ठेकेदारीने तीन जिल्ह्यांत शंभर बळी घेतले. याची चौकशी ‘ईडी-बिडी’ करणार आहे काय?
आरोग्य खात्याचा निधी गेला कोठे? इस्पितळात डॉक्टर नर्सेस का नाहीत? आरोग्य मंत्री कोठे झोकांड्या देत फिरत आहेत याचे उत्तर कोण देणार? नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
खरं तर राज्याच्या निर्दय आरोग्य मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. नांदेडच्या ‘डीन’ला जो न्याय लावला तोच न्याय नागपूर, छत्रपती संभाजीनगर इस्पितळांच्या डीनला का लावला नाही?
महाराष्ट्रात असे मृत्यूचे तांडव व नातेवाईकांचा आक्रोश सुरू असताना सरकारच्या डोळ्यांत अश्रूचे एक टिपूस नव्हते. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवत बसले.
दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रीपद मिळत नाही म्हणून रुसून बसले. देवेंद्र फडणवीस आजही तीच तीच तीन वर्षांपूर्वीची गुळगुळीत टेप वाजवीत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची सूचना शरद पवारांची होती असे ते एका कार्यक्रमात पुन्हा म्हणाले. अशा ‘टिपा ‘ वाजवून सरकारी इस्पितळातील मृत्यूचे तांडव थांबणार आहे काय?
इस्पितळांत औषधे नाहीत, डॉक्टर नाहीत यावर फडणवीस का बोलत नाहीत? आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा भ्रष्ट आणि विकलांग करून सोडली आहे. आरोग्य खात्यातील नेमणुकांचेही रेट कार्ड’ ठरले आहे व सरकारी इस्पितळांतील मृत्युकांडाचे तेच मुख्य कारण आहे. आरोग्य यंत्रणेचे ऑडिट करून खरे चित्र समोर येणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या आडातच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार? आरोग्य व्यवस्थापन कशाशी खातात हे त्यांच्या खिजगणतीत नसेल. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या सुभेदारीवर खूश झाले आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ममग्न अवस्थेत पंखांशिवाय उडत आहेत. जनता मात्र रोज मरणयातना भोगत आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात आदिवासी पाड्यांवर गर्भवतींना ‘डोली’तून बाळंतपणासाठी न्यावे लागते व अनेकदा वाटेतच बाळ, बाळंतिणीचा मृत्यू होतो.
सरकारी औषध खरेदीत सर्वाधिक घोटाळा होतो व त्यातील दलाली हा चिंतेचा विषय आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचे लक्ष आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर नसून औषध खरेदीतील दलालीवरच असेल तर सरकारी आरोग्य व्यवस्था कोलमडणार नाही तर काय? मुंबई महापालिकेने चालविलेल्या जम्बो कोविड सेंटरची ‘ईडी’ चौकशी सध्या सुरू आहे.
भाजपचे काही नागडे याप्रकरणी खोट्या तक्रारी दाखल करून रुग्णांच्या जिवाशी कसा खेळ झाला वगैरे सांगत आहेत, पण आज शासकीय रुग्णालयांतील ‘मृत्यू’ ज्या पद्धतीने सुरू आहेत तो फक्त भ्रष्टाचार नसून कमिशनबाजीचा अमानुष कारभार आहे. त्यावर हे ‘नागडे’ कधी तक्रारी करणार व तुमची ती ‘ईडी’ अशा दलालीचा तपास कधी करणार?
मुंबई हायकोर्टाने औषधे व डॉक्टरांच्या कमतरतेवर प्रश्न उपस्थित केले. हे एक प्रकारे सरकारवर ताशेरेच आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे.
यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते.
पुरोगामी महाराष्ट्राचे हे निर्दय आणि अमानुष चित्र आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील यमाचा दरबार महाराष्ट्राच्या इभ्रतीस काळिमा फासणारा आहे.
या राज्यात आमदार खासदारांना विकत घेण्यासाठी मुबलक पैसा आहे, पण शासकीय इस्पितळांत औषध खरेदीसाठी पैसे नाहीत. यमाचा रेडाही हे चित्र पाहून रडत असेल. शेम! शेम! शेम!
सौजन्य – सामना
महत्त्वाच्या बातम्या
- Shalini Thackeray | “…तर मनसे तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजल्याशिवाय राहणार नाही”; शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा
- Mla Disqualification | शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार निर्णय
- Bacchu Kadu | भाजप मित्र म्हणून जवळ घेतो अन् अफजलखानासारखी मिठी मारतो – बच्चू कडू
- Ashish Deshmukh | खोटारडे देवेंद्र फडणवीस नाही तर उद्धव ठाकरे – आशिष देशमुख
- Amol Mitkari | भाजपमध्ये असताना नाना पटोले मलाई खायचे – अमोल मिटकरी