Sunil Gavaskar | “क्रिकेट सोडून फॅशन शोमध्ये…” ; सरफराजला वगळल्यानंतर सुनील गावस्कर यांची संतप्त प्रतिक्रिया

Sunil Gavaskar | टीम महाराष्ट्र देशा: बीसीसीआय (BCCI) ने सरफराज खान (Sarfaraj Khan) च्या कामगिरीकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी निवडकर्त्यांवर टीका केली आहे. सरफराज गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मात्र, तरीही त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही. रणजी करंडकमध्ये सरफराजने उत्कृष्ट खेळी खेळली होती. मात्र, चेतन शर्माच्या अध्यक्षतेखाली असलेली निवड समिती या फलंदाजावर दुर्लक्ष करत आहे.

सरफराज खानची भारतीय संघात निवड न झाल्याने सुनील गावस्कर यांनी निवड समितीच्या धोरणांवर टीका केली आहे. ते म्हणाले आहे, “शतक पूर्ण झाल्यानंतर सरफराज खान क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरतो. तो एक फिट खेळाडू आहे. तुम्हाला जर फक्त स्लिम आणि ट्रिम खेळाडू हवे असतील, तर तुम्ही फॅशन शोमध्ये जायला हवे. त्यानंतर तुम्ही काही मॉडेल्स निवडून त्यांच्या हातात बॅट आणि बॉल देऊन त्यांना संघात सामील करू घेतले पाहिजे.”

पुढे बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “तुम्हाला प्रत्येक शेप आणि साईजमध्ये क्रिकेटपटू मिळतील. पण तुम्ही त्यांची साईज बघून निवड करू नका. खेळाडूंची कामगिरी बघून त्यांची निवड करा. खेळाडूंची निवड करताना धावा आणि विकेट्स बघून त्यांना संघात घ्या.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सरफराज म्हणाला होता, “बंगळुरुमध्ये रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मी शानदार शतक केले. त्यानंतर मी निवडकर्त्यांची भेट घेतली होती. तेव्हा मला निवड समितीने सांगितले होते, तुला बांगलादेशात संधी मिळेल त्यासाठी तू तयार रहा. अलीकडेच मी चेतन शर्मा सर यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी मला निराश न होण्यास सांगितले होते. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो तुला लवकरच संधी मिळेल, असं ते मला यावेळी म्हणाले होते.”

पुढे बोलताना सरफराज म्हणाला होता, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी जेव्हा संघ जाहीर झाला, तेव्हा त्यामध्ये माझं नाव नव्हतं. ते बघून मला खूप वाईट वाटलं. त्यावेळी तिथे माझ्या जागी कुणीही असतं तर त्याला दुःख झालं असतं. कारण मला यावेळी खेळण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. या निर्णयानंतर मला खूप एकट वाटत होतं.”

महत्वाच्या बातम्या