Sushma Andhare | “रामदेव बाबांवर गुन्हा का दाखल झाला नाही?”; अंधारेंचा संतप्त सवाल

Sushma Andhare | बीड : सध्या महिलांच्या कपड्यांवरुन राज्याच्या राजकारणात अनेक टीका-टिपण्णी सुरु आहे. भगव्या बिकनीमुळे अभिनेत्री दिपिका पादुकोण त्यानंतर फॅशन आयकॉन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील तोकड्या कपड्यांवरुन सुरु असलेला वाद यामुळे महिलांच्या कपड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

योगगुरू रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. “महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात”, असे आक्षेपार्ह वक्तव्य रामदेव बाबांनी केले होते. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. याच प्रकारावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. “रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही?” असा संतप्त सवालही यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

“महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात, हे वक्तव्य अतिशय गंभीर असून यावर एकानेही आक्षेप घेतला नाही. रामदेव बाबांवर गुन्हा दाखल केला जात नाही?, हा किती गलिच्छपणा आहे. खरं तर, तिथे विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. कारण भारतीय संविधानातील कलम 354 नुसार, विनयभंगाची संज्ञा अशी सांगते की, जिथे एखादे उच्चारण, वाक्य, कृती, उक्ती किंवा घटनेमुळे महिलांना लज्जा किंवा संकोच उत्पन्न करते, तिथे विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो”, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, “आता रामदेव बाबांचं वक्तव्य आम्हा महिलांना संकोच निर्माण करणारं आहे. आमच्या स्त्री सुलभतेला लज्जा उत्पन्न करणारं आहे. रामदेव बाबांशेजारी मंचावर या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी उपस्थित होत्या. त्यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. पण त्यानंतर उर्फी जावेद नावाच्या कोणत्या तरी व्यक्तीवर एवढी चर्चा का होते?” असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या