Share

NEET Protest in Delhi: रक्ताळलेले विद्यार्थी आणि दडपशाहीचे मॉडेल, सत्तेचा अहंकार लोकशाहीला गिळणार का?

दिल्लीत नीट विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; सत्तेच्या या दडपशाहीविरोधात देशभरातून संताप व्यक्त.

Published On: 

Student NEET Protest Delhi lathi charge by police | Narendra Modi

दिल्ली– देशाचं भविष्य घडवणारे हात रक्ताने माखले असतील, तर आपण महासत्ता होण्याचं स्वप्न कोणत्या तोंडाने पाहणार? दिल्लीच्या रस्त्यांवर न्याय मागणाऱ्या ‘नीट’ (NEET Protest) विद्यार्थ्यांवर काल झालेल्या अमानुष लाठीचार्जने व्यवस्थेच्या क्रूरतेवर एक भयानक प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना पेपरफुटीचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थी शांततेत रस्त्यावर उतरले होते. पण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने त्यांच्यावर थेट अश्रुधूर सोडला आणि बेदम लाठीचार्ज केला. काल रात्री घडलेल्या या घटनेत अनेक विद्यार्थ्यांची डोकी फोडली गेली, तर काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

Student NEET Protest: संयमाचा अंत की दडपशाहीचं नवं मॉडेल?

एका विद्यार्थिनीने भररस्त्यात रडत रडत सांगितलेली कहाणी मन सुन्न करणारी आहे. आम्ही काय डाकू आहोत का असा थेट सवाल करत, पोलिसांनी मुलींना शिव्या देत मारहाण केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टरांनाही पोलिसांनी सोडलं नाही.

आम्ही डॉक्टर आहोत हे सांगूनही आम्हाला मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप एका तरुण डॉक्टरने केला आहे. लहान मुलांची डोकी फोडली गेली आणि पाय तोडले गेले. मदत तर सोडाच, उलट पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरून मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

दुसरीकडे मुंबईतही याच मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. आई-वडिलांना पोलीस गाडीत कोंबत असताना तिथे उभ्या असलेल्या एका लहानग्याने ‘पापा… पापा…’ करत फोडलेला हंबरडा काळजाला चिरणारा होता.

नेमक्या याच क्रूरतेच्या विरोधात सोनम वांगचुक यांनी उपोषणाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. जोपर्यंत संसदेत विद्यार्थ्यांचा आवाज घुमणार नाही आणि शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित होणार नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे.

या तणावाच्या वातावरणातही एक अत्यंत वेगळे चित्र दिल्लीत पाहायला मिळाले. लाठीचार्ज करणारे रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान रात्री घरी जात असताना, आंदोलक विद्यार्थ्यांनी चक्क टाळ्या वाजवायला सुरुवात केली. वरवर पाहता हे स्वागत वाटत असले तरी, प्रत्यक्षात हा विद्यार्थ्यांचा शांततापूर्ण आणि उपहासात्मक निषेध होता. कारवाई करणाऱ्या आणि बळाचा वापर करणाऱ्या जवानांना विद्यार्थ्यांनी अत्यंत संयमाने उत्तर दिले आहे. हातात काठ्या घेतलेल्या जवानांसमोर रिकाम्या हातांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहणारे हे तरुण आज व्यवस्थेला एक मोठा प्रश्न विचारत आहेत.

याआधी शेतकऱ्यांनी जेव्हा आपल्या हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले, तेव्हा त्यांनाही खलिस्तानी ठरवून हिणवले गेले. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकणारी हीच व्यवस्था आता विद्यार्थ्यांच्या मार्गात लाठ्या घेऊन उभी आहे. त्यामुळेच दडपशाहीचे हेच मॉडेल सरकार प्रत्येक आंदोलनासाठी वापरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि खासदार रेणुका चौधरी यांनीही सरकारला थेट जाब विचारला आहे. संसद ही कुणाची जहागीर नाही, तिथे देशाच्या प्रश्नांवर चर्चा झालीच पाहिजे. एवढा मोठा गोंधळ होऊनही शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही, हा सवाल आता विचारला जात आहे.

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान परदेशात फिरत असतात आणि देशात तरुणांवर लाठ्या पडत आहेत, हे चित्र लोकशाहीची चेष्टा करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या या व्यवस्थेला आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या व्हिडिओची आठवण करून देणे गरजेचे आहे. आमचे सरकार असताना मोर्चांवर लाठीचार्ज करायचा नाही अशी सक्त ताकीद होती आणि मंत्र्यांनी खाली रस्त्यावर येऊन जनतेचे म्हणणे ऐकले पाहिजे, असे बाळासाहेब स्पष्ट सांगायचे. आजच्या राजकारणातून तोच जनमताचा आदर हरवला आहे.

गेल्या दहा बारा वर्षांपासून सत्ताधाऱ्यांना प्रामाणिकपणे पाठिंबा देणारा एक मोठा वर्ग आता या घटनांमुळे अस्वस्थ झाला आहे. देशात सध्या जे सुरू आहे ते पाहून अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. आपली निष्ठा कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा देशाप्रती असली पाहिजे, ही भावना आता तरुण वर्गात जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवणारं हे कसलं सरकार? पोलिसांच्या क्रूरतेने देश हादरला

पोलिसांच्या लाठ्या खातानाही हे तरुण ‘इंकलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत. तरुणाईचा हा राग वेळीच समजून घेतला नाही आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला नाही, तर या असंतोषाचा भडका संपूर्ण देशभरात उडायला वेळ लागणार नाही.

बेरोजगारीने आधीच कंबरडे मोडलेले असताना, हुशार विद्यार्थ्यांवर असा अन्याय देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि प्रगतीला कित्येक वर्षे मागे खेचेल. शेतकऱ्याचा आक्रोश असो वा विद्यार्थ्यांचा टाहो, दडपशाहीने प्रश्न सुटत नाहीत. सरकारने वेळीच जागे होऊन या तरुणांना न्याय दिला नाही, तर हीच तरुण पिढी येत्या काळात सत्तेच्या सिंहासनाला मोठा धक्का लावल्याशिवाय राहणार नाही.

लेखक – मनोज जाधव (संपादक- महाराष्ट्र देशा)

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही