Nagpur Dahi Handi: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर म्हणजेच उपराजधानी नागपुरातच पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी शहरात १ नोव्हेंबरपर्यंत डीजेवर कडक बंदी घातली असली, तरी अनेक ठिकाणी हे आदेश थेट धुडकावून लावल्याचं चित्र आहे. सध्या नागपुरात डीजेच्या दणदणाटात आणि लेझर लाईट्सच्या झगमगाटात दहीहंडी उत्सव सुरू असून, खुद्द पोलिसांच्या उपस्थितीतच या नियमांचे धिंडवडे निघताना दिसत आहेत.
नागपूरच्या ‘बडकस चौक मित्र परिवार’ने सकाळपासूनच डीजे लावणार, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे संध्याकाळी दहीहंडी उत्सवाला सुरुवात होताच तिथे डीजेचा दणदणाट सुरू झाला. विशेष म्हणजे, यावेळी तिथे पोलीस प्रशासनाचा फौजफाटा उपस्थित होता. मात्र, थेट कारवाई करण्याऐवजी पोलीस केवळ आवाजाच्या मर्यादेची नोंद घेताना दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सातच्या सुमारास तिथे तब्बल ८० ते ८२ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. आता या उघड उल्लंघनावर पोलीस नक्की काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.
नागपूर डीजे बंदीवरून भाजप नेत्यांमध्येच दोन गट; प्रवीण दटके विरुद्ध संदीप जोशी
दुसरीकडे, पोलीस आयुक्तांच्या या निर्णयानंतर सत्ताधारी भाजपमध्येच दोन वेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या बंदीला तीव्र विरोध करत, “नेहमी हिंदूंच्या सणांच्या वेळीच डीजेवर बंदी का घातली जाते?” असा खडा सवाल उपस्थित केला आहे. पण त्याच पक्षाचे माजी आमदार संदीप जोशी यांनी मात्र वेगळीच भूमिका घेत ही बंदी केवळ दोन महिन्यांची नको, तर कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे.
रुग्णालयातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिलांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो, असे सांगत जोशी यांनी आपली भूमिका हीच लोकभावना असल्याचं म्हटलं आहे. थोडक्यात सांगायचं तर, त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागपुरातील २० ते २५ मंडळांनी डीजे न लावण्याचं लेखी हमीपत्रही त्यांना दिलं आहे. तरीही बडकस चौकासारख्या ठिकाणी उडत असलेला हा डीजेचा धुरळा पाहता, पोलिसांच्या आदेशाला नक्की किती किंमत उरलीये, हाच खरा प्रश्न आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुजोर व्यवस्थेला जाग कधी येणार? विद्यार्थ्यांच्या आक्रोशावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
- रोहितवर BCCI चा बडगा! ‘वयचोरी’ प्रकरणी २ वर्षांची बंदी, अनेक खेळाडू रडारवर
- जंतरमंतरवर विद्यार्थिनीच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला! ‘कवटी फोडली’ म्हणणाऱ्या आरोपीला अटकेसाठी पोलिसांना ७२ तासांचा अल्टिमेटम












