पैठण | किरण काळे पाटील : ३० कोटींचा घोटाळा करून कुणीही सहज सुटू शकतं? संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणात (Sant Eknath Sugar Factory Scam) गेल्या चार महिन्यांत घडलेल्या घडामोडी पाहिल्या, तर कायद्याची लढाई किती रंगतदार आणि नाट्यमय असू शकते, याचा प्रत्यय येतो. सचिन घायाळ (Sachin Ghayal) यांनी ३० कोटींचे कर्ज घेऊन पैशांची कशी अफरातफर केली आणि त्यानंतर जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालय ते उच्च न्यायालय अशी कशी धावपळ केली, याचा संपूर्ण घटनाक्रम आता अधिकृत कागदपत्रांवरून उलगडला आहे.
एप्रिल ते जुलै या अवघ्या चार महिन्यांत पैठणच्या सत्र न्यायालयाने घायाळ यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सलग दोनदा फेटाळून लावले होते. त्यानंतर मे महिन्यात उच्च न्यायालयानेही त्यांना मोठा दणका दिला होता. पण अखेर ऑगस्टमध्ये त्यांना जो तात्पुरता दिलासा मिळाला, तो या कायदेशीर संघर्षातील एक अत्यंत रंजक टप्पा ठरला आहे.
११२ एकर तारण, ८ दिवसांत १६ कोटी गायब अन् जमिनीचा खेळ
अधिकृत एफआयआरनुसार या घोटाळ्याची व्याप्ती भयंकर मोठी आहे. ३० कोटींच्या कर्जासाठी कारखान्याची केवळ मशिनरी नाही, तर तब्बल ११२ एकर (४५.७१ हेक्टर) जमीन, पेट्रोल पंप आणि कर्मचारी कॉलनी चक्क पणाला लावण्यात आली होती. या कर्जाच्या कागदपत्रांवर तत्कालीन चेअरमन तुषार शिसोदे, कार्यकारी संचालक रोहित लोंढे आणि विठ्ठल आगळे यांच्याही सह्या आहेत. सर्वात मोठा पैशांचा खेळ HDFC बँकेच्या Current Account मध्ये झाला. पैसे जमा होताच ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२१ या अवघ्या आठ दिवसांत १६ कोटी रुपये काढण्यात आले. हे पैसे आधुनिकीकरणासाठी न वापरता ‘अशोक शुगर’, ‘देवेंद्र पॉवर सोल्युशन’ आणि ‘HLICUL’ अशा कारखान्याशी पूर्णपणे असंबंधित ठिकाणी वळवण्यात आले.
जेव्हा विशेष लेखापरीक्षक (Auditor) सुरेश काकडे हे तहसीलदार आणि पोलिसांना घेऊन कारखान्यात गेले, तेव्हा तिथे फक्त अमोल घायाळ नावाचा कर्मचारी होता आणि त्याने रेकॉर्ड देण्यास स्पष्ट नकार दिला. कारवाईची कुणकुण लागताच कारखान्यातील सर्व महत्त्वाचा डेटा असलेले संगणक आणि फाईल्स गायब करण्यात आल्याचा थेट ठपका तपासात ठेवण्यात आला आहे. यानंतर ऑडिटर जेव्हा कंपनीच्या (SGSPL) नोंदणीकृत कार्यालयात गेले, तेव्हा घायाळ यांच्या पत्नीने त्यांना अडवून तिथून हाकलून लावले. सचिन घायाळ यांनीही फोनवर उडवाउडवीची उत्तरे देत, “तुम्हाला माझ्या कंपनीचे ऑडिट करण्याचा कोणताही अधिकार नाही,” असे अधिकाऱ्याला सुनावले होते.
Sachin Ghayal Sant Eknath Sugar Factory 30 crore loan scam inside story
सर्वात मोठा गौप्यस्फोट जमिनीच्या खरेदीवरून
घायाळ यांच्या कंपनीने ३० कोटींच्या कर्जापैकी १ कोटी रुपये बंद पडलेल्या औरंगाबाद पेपर मिल्सच्या खात्यात वळवले होते. जेव्हा पोलिसांनी पेपर मिल्सचे संचालक बादल मित्तल यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा ही रक्कम कोणत्याही मशिनरीसाठी नसून, ९.८७ हेक्टर (अंदाजे २४.३९ एकर) जागेच्या खरेदीचा ॲडव्हान्स असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, ही रक्कम नंतर परत घेतली गेली आणि २ सप्टेंबर २०२२ रोजी त्याच जागेची थेट ‘इथेनॉल किंग प्रायव्हेट लिमिटेड’ या खाजगी कंपनीच्या नावे खरेदी झाली. या इथेनॉल किंग कंपनीच्या संचालक दुसऱ्या कुणी नसून सचिन घायाळ यांच्या पत्नी अभिरुची घायाळ या आहेत.
दुसरीकडे, हा आकडा फक्त ३० कोटींवर थांबलेला नाही. नियमित हप्ते न भरल्याने बुलढाणा अर्बन बँकेने कारखान्याला तब्बल ४२ कोटी ४५ लाख रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या ८ मे च्या निकालपत्रात स्पष्ट नमूद आहे की, मुख्य आरोपी सचिन घायाळ यांच्यावर याआधीही फसवणूक आणि हाणामारीचे तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
हायकोर्टाचा दणका बसल्यानंतरही घायाळ थांबले नाहीत. त्यांनी विभागीय सहसंचालकांचा (साखर) ३० जून २०२६ चा एक आदेश मिळवला आणि २२ जुलै २०२६ रोजी पुन्हा पैठण सत्र न्यायालयात दुसरा जामीन अर्ज दाखल केला. पण मा. न्यायाधीश गाडवे यांनी कायद्याचा अचूक कीस काढत हा अर्जही फेटाळला. न्यायालयाने स्पष्ट केले की, घायाळ यांच्यावरील मूळ गुन्हा हा सहकार कायद्याच्या ‘कलम ८१’ अंतर्गत झालेल्या सक्तीच्या ऑडिटवर आधारित आहे. तर त्यांनी आणलेला नवा ३० जूनचा आदेश हा ‘कलम ८३’ (चौकशी) अंतर्गत आहे. या दोन्ही कलमांचे हेतू पूर्णपणे वेगळे असल्याने, जुना गुन्हा रद्द होत नाही, असा निर्वाळा देत कोर्टाने त्यांना पुन्हा रिकाम्या हाताने घायाळ यांना परत पाठवले.
अखेरीस, सर्व दरवाजे बंद होताना पाहून घायाळ यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ गाठले. तिथे १२ ऑगस्ट २०२६ रोजी मात्र परिस्थिती बदलली. मा. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या पीठाने ३० जूनच्या नव्या अहवालाची दखल घेत, घायाळ यांना १० सप्टेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. एका बाजूला कामगारांचे पैसे थकीत आहेत, अवमान याचिकेत जामीनपात्र वॉरंट निघत आहेत आणि दुसरीकडे कोर्टात कायद्याचा लपंडाव सुरू आहे. आता १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत तपास यंत्रणा कोणती नवी खेळी करते, यावर या बहुचर्चित घोटाळ्याचे भवितव्य ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- चिकलठाणा पोलिसांची धडक कारवाई: १ लाखांच्या मुद्देमालासह दोन गोवंश तस्कर ताब्यात; ५ मुक्या जनावरांना जीवदान!
- तुकाराम मुंढेंना थेट मुख्यमंत्री करा; अमित शाहांकडे पत्र, राज्यात चर्चेला उधाण
- 17 दिवसांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं! वसतिगृहातील DBT बंद, आता मेसची सुविधा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











