पैठण | किरण काळे पाटील ( Pachod Beef Raid) : पाचोडमध्ये शुक्रवारी सकाळी शासकीय दवाखान्याच्या मागेच चारचाकी गाडीतून गोमांसाची विक्री सुरू होती. पोलिसांची धाड पडताच तस्करांनी ५ लाखांची गाडी आणि मोबाईल जागेवरच सोडून धूम ठोकली होती.
पाचोड पोलिसांनी बागवान गल्लीतील मस्जिदजवळ छापा मारून तब्बल ५ लाख ५३ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १०० किलो गोमांस, एक लाल रंगाची टाटा सुमो गाडी आणि कत्तलीच्या साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात राजू मोहम्मद कुरेशी (रा. ब्राम्हणगाव) आणि त्याच्या एका अज्ञात साथीदारावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pachod Beef Raid : पोलिसांची धडक कारवाई, पण मुख्य आरोपी पसार!
२८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पाचोडचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) महादेव नाईकवाडे यांना एक गोपनीय बातमी मिळाली. शासकीय दवाखान्याच्या मागे एका लाल रंगाच्या टाटा सुमो (MH-28 C-4570) गाडीत गोमांस आणून विकलं जात असल्याचं त्यांना समजलं. वेळ न दवडता बीट जमादार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अण्णासाहेब गव्हाणे, पोउपनि नाईकवाडे आणि त्यांच्या पथकाने (पोअं केदार, बालोदे) सकाळी ९:५० वाजता थेट घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांना समोर पाहताच गोमांस विकत असलेल्या दोघांनी तिथून पळ काढला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अर्शद सलिम बागवान या प्रत्यक्षदर्शीने एका पळून गेलेल्या आरोपीचे नाव राजू कुरेशी असल्याचे पोलिसांना सांगितले, तर दुसऱ्याचे नाव त्याला माहीत नव्हते. पोलिसांनी जागेवरच सविस्तर पंचनामा करून जप्ती केली. यात ४० हजार रुपये किमतीचे अंदाजे १०० किलो गोमांस, ५ लाख रुपयांची टाटा सुमो, आणि १० हजारांचा रेडमी ५जी मोबाईल जप्त करण्यात आला. याशिवाय लोखंडी वजन काटा, वजन मापे, दोन सत्तूर, दोन चाकू, लाकडी ठोकळे आणि ४१० रुपये रोख असा एकूण ५,५३,७१० रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गांधले यांनी घटनास्थळी येऊन मांसाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी सीलबंद केले. तर उर्वरित खराब झालेले मांस पंचांसमक्ष जमिनीत खड्डा खोदून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी सहायक पोलीस उप-निरीक्षक अण्णासाहेब गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५, ५ए, ५बी, ५सी, १, ९, ९ए आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३(५) अंतर्गत गुन्हा (FIR No. 0355) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि महादेव नाईकवाडे करत आहेत.
ढोरकीनमध्ये पोलिसांनी केवळ एका वृद्धावर कारवाई करून सप्लाय चेन लपवली होती. दुसरीकडे पाचोड पोलिसांनी मात्र थेट वाहतूक करणारी टाटा सुमो गाडीच जप्त केली आहे. आता पोलिसांच्या हाती लागलेल्या रेडमी ५जी मोबाईलवरून या तस्करांचे आणखी कोणाशी लागेबांधे आहेत, हे उघड होण्याची शक्यता आहे. पळून गेलेल्या राजू कुरेशीला पोलीस किती लवकर बेड्या ठोकतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ओबीसींच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; 1 सप्टेंबरला आझाद मैदानात काय होणार?
- मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवी टीम तयार; 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर
- कोट्यवधींचा दंड, कारवाई मात्र नावापुरती! ७३ कोटींच्या वसुलीसाठी शासनाच्या हाती फक्त ५७ लाखांची मालमत्ता? महसूल विभागाचा अजब कारभार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








