The Nines Bar Pune: महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आयोगाच्या माजी अध्यक्षांनी थेट बिअर बार उघडावा? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण पुण्यात सध्या असंच काहीसं घडलंय. आणि याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रूपाली चाकणकरांवर थेट हल्लाबोल केलाय.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात ‘द नाईन्स’ नावाच्या एका आलिशान हॉटेलचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं. हे केवळ हॉटेल नसून एक बार आणि रेस्टॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा नवा व्यवसाय राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा आहे. या उद्घाटनाला माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार सुनील शेळके यांच्यासारखे नेते उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात या नव्या हॉटेलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Sushma Andhare criticizes Rupali Chakankar over The Nines Pune Bar
या सगळ्या प्रकारावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या की, व्यवसाय कुणी कोणता निवडावा, हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या आणि महिला आयोगावर कधीकाळी राहिलेल्या बाईंनी थेट बार उघडावा का? अंधारेंच्या या सडेतोड प्रश्नामुळे आता राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
रूपाली चाकणकर गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात त्यांचं नाव आल्याने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणावरून झालेल्या वाढत्या टीकेमुळे त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावं लागलं. आणि आता थेट बार सुरू केल्याने त्या पुन्हा एकदा रडारवर आल्या आहेत.
दुसरीकडे, याच भोंदूबाबा प्रकरणावरून आपली बदनामी झाल्याचा दावा करत चाकणकर (Rupali Chakankar) यांनी थेट पोलिसांत धाव घेतली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात स्वतः सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरे, दीपाली सय्यद यांच्यासह शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे हा वाद आता आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- खवड्या डोंगर मृत्यू प्रकरण: ‘कुणालला आत्महत्या करायची नव्हती तर…’, मावशीच्या दाव्याने प्रकरणाला नवा ट्विस्ट
- प्रेमापोटी चक्क MPSC चा पेपर फोडला! ‘लव्हस्टोरी’मुळे औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द
- गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा दे धक्का! बाजूला सारत काढली स्वतःचीच नवी एसटी कामगार संघटना












