Sanjay Raut | “…म्हणून राष्ट्रवादीने भाजपसोबत”; नागालँडमधील भाजप पाठिंब्यावर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : नागालँडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँडच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र दिसणार आहेत. या निवडणुकीत स्थानिक एनडीपीपी-भाजप आघाडीला बहुमत मिळालं आहे.

या आघाडीला ३७ जागा मिळाल्या आहेत. तर ७ जागांसह तिसऱ्या स्थानी असणाऱ्या राष्ट्रवादीनं विजयी आघाडीला पाठिंबा दिला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. राष्ट्रवादीने भाजपप्रणित आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावर शरद पवारांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर आज मित्रपक्ष ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“तिथे भाजपने सत्ता स्थापन केलेली नाही. तिथल्या प्रादेशिक पक्षाचे नेते रिओ, जे आमच्याबरोबर संसदेत काही काळ खासदारही होते, त्यांच्या पक्षाला २५ ते २६ जागा मिळाल्या आहेत. त्यांचा मुख्य पक्ष आहे. नागालँड हे सीमेवरचं राज्य आहे. संवेदनशील आहे. ते काश्मीरपेक्षा जास्त संवेदनशील राज्य आहे. तिथेही दहशतवाद, इतर कारवायांचा धोका असतो. रिओ यांच्या पक्षाबरोबर भाजपची युती होती. भाजपला १० ते १२ जागा मिळाल्या आहेत. इतर अनेक लहान पक्ष आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलंय”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती अनेकदा काश्मीरपेक्षा अत्यंत गंभीर असते. तिथल्या मुख्य पक्षाचं सरकार आहे, सरकार भाजपाचं नाही. भाजप त्यांच्यासह सरकारमध्ये इतर पक्षांसमवेत सामील झाला आहे. पण हरकत नाही, आज महाविकास आघाडीची यासंदर्भात चर्चा आहे. त्यावेळी हा विषय चर्चेत येईल”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut Talk about Nagaland Election

“नागालँडमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे, असं नाही. याआधीही नागालँडमध्ये अशा प्रकारचं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग झालाय. कारण ती त्या राज्याची गरज आहे. ज्याप्रकारच्या घडामोडी त्या राज्यात आणि सीमेवर घडत असतात, त्यामुळे तिथे राजकीय संघर्ष असू नये, विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं टाकता यावीत, यासाठी अशा प्रकारचे निर्णय नागालँडच्या बाबतीत घेतले जातात. अर्थात, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस थोडा कमी पडतोय”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

शरद पवार काय म्हणाले?

“नागालँडमध्ये निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तेथील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपाबरोबर आम्ही युती केली नाही. नागालँडमधील चित्र बघितल्यानंतर तेथे एक प्रकारे राजकीय स्थैर्य येण्यासाठी आमची मदत मुख्यमंत्र्यांना होत असेत, तर आमचा पाठिंबा आहे. मात्र, भाजपाला आमचा पाठिंबा नाही. मेघालय आणि शेजारील राज्यात निवडणुका पार पडल्या.,” अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-