“एखाद्या मोठ्या नेत्याचं कौतुक केलं नाही तर तो देशद्रोह ठरतो का?” असा तिखट सवाल आता उपस्थित झालाय. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी आणि अभिनयासाठी ओळखले जातात, पण यावेळी मुंबई विद्यापीठाने त्यांच्यासोबत जे केलं, त्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असलेल्या शाह यांना ऐनवेळी कार्यक्रमातून वगळण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाने १ फेब्रुवारीला एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यासाठी नसीरुद्दीन शाह यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी, म्हणजेच ३१ जानेवारीच्या रात्री त्यांना “तुम्ही कार्यक्रमाला येण्याची गरज नाही,” असा निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे, यासाठी कोणतंही कारण देण्यात आलं नाही किंवा साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. उलट, “शहा यांनीच यायला नकार दिला,” अशी थाप विद्यापीठाने उपस्थितांना मारल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला आहे.
Naseeruddin Shah Article
या संपूर्ण प्रकारावर शाह यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये (The Indian Express) लेख लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शाह हे ‘देशविरोधी’ वक्तव्य करतात, असं कारण दिलं होतं. यावर शाह चांगलेच भडकले. त्यांनी थेट आव्हान दिलंय, “माझं एक तरी असं वाक्य दाखवा, ज्यात मी देशाबद्दल वाईट बोललोय.” मी सरकारच्या धोरणांवर टीका करतो आणि ती यापुढेही करत राहणार. जे मुद्दे मला आणि माझ्यासारख्यांना त्रास देतात, त्यावर मी आवाज उठवत आलोय, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले आहे.
देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना शाह भावूक झाले. “हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो आणि ज्यावर प्रेम करायला मला शिकवण्यात आलं,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. जॉर्ज ऑरवेलच्या ‘1984’ या गाजलेल्या कादंबरीचा दाखला देत ते म्हणाले की, सध्या विचारांवर पहारा ठेवला जातोय आणि सगळीकडे द्वेषाचं वातावरण आहे. जो द्वेष (Hate) पूर्वी दोन मिनिटांचा असायचा, तो आता २४ तासांचा झाला आहे.
कामाच्या आघाडीवर, शाह नुकतेच ‘गुस्ताख इश्क’मध्ये दिसले होते आणि लवकरच अनुभव सिन्हांच्या ‘अस्सी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “ICC चं ऑफिस भारतात असतं तर बॉम्बनं…” पाकिस्तानी यूट्यूबरची धमकी
- अजितदादांच्या आठवणीत गौतमी पाटील भावूक; दादांच्या ‘त्या’ दोन शब्दांनी जिंकलं होतं मन!
- अभिषेक शर्माचा जोडीदार कोण? ईशान किशन की संजू सॅमसन?; सूर्याच्या एका निर्णयानं पलटलं गणित!













