🕒 1 min read
तब्बल ४००० कोटी रुपये खर्चून बनत असलेल्या ‘रामायणम्’ (Ramayanam Movie) चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. पण, सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीला (Sai Pallavi) पाहिल्यावर तुमच्याही भुवया उंचावल्या आहेत का? याच कास्टिंगवरून आता एका दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याने थेट दिग्दर्शकालाच फैलावर घेतलंय.
नुकतंच मुंबईत या सिनेमाच्या ट्रेलर लाँचआधी कलाकारांची ओळख करून देण्यासाठी एक मोठा इव्हेंट पार पडला. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत झळकणार आहे, तर साई पल्लवीला माता सीतेची भूमिका मिळाली आहे. पण, ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना ही निवड अजिबात रुचलेली नाही.
Ramayanam Movie
‘झूम’ वाहिनीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर यांनी या सिनेमावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “हे लोक दुसरं काय बनवणार? ते जास्तीत जास्त रामानंद सागर यांच्या रामायणात तांत्रिक सुधारणा करतील. पण तुम्ही सीतेची भूमिका साकारण्यासाठी कोणाची निवड केलीय, हे आधी समजून घ्यायला हवं. आपल्या देशात सीतेला माता मानलं जातं. इथले लोक प्रभू श्रीरामांची भगवान नारायण यांचा अवतार म्हणून पूजा करतात. त्यामुळे अशा कास्टिंगवर साहजिकच प्रश्न निर्माण होतात.”
अन्नू कपूर यांचा राग इथेच शांत झाला नाही. त्यांनी थेट या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यावरही निशाणा साधला. “कोण आहेत हे नितेश तिवारी? त्यांची लायकी काय आहे? हिंदू धर्माचा अपमान करून ते चित्रपट बनवत आहेत, पण त्यांना याचा मोठा फटका बसेल,” असा घणाघात त्यांनी केला.
आपण नितेश तिवारी यांना अजिबात ओळखत नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. मी त्यांचे चित्रपट पाहिलेले नाहीत आणि त्यामुळे माझं काही नुकसान झालंय असं मला वाटत नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रामायणम्’ हा महाकाय चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याचा पहिला भाग यंदाच्या दिवाळीत, तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल. या चित्रपटात यश, सनी देओल, लारा दत्ता, अरुण गोविल यांसारखी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. आता अन्नू कपूर यांच्या या जळजळीत टीकेनंतर निर्माते काही स्पष्टीकरण देतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ४००० कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले पडद्यावरून सुटलेला बाण….
- २४ तासांत चांदी तब्बल १८ हजारांनी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण; आज काय आहेत ताजे दर?
- ठाकरे गटाला मोठा धक्का; ६ खासदार शिंदेंकडे; सर्वोच्च न्यायालय गुलाम, संजय राऊतांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












