मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही आंबेडकरांनी विरोधी पक्षांना केले आहे. मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी ‘नीट’ (NEET) परीक्षा प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, सुरुवातीची परीक्षा चुकीच्या पद्धतीने घेण्यात आली होती आणि फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे नमूद करत, त्यांनी म्हटले की सरकारच्या भूमिकेमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच संशय निर्माण झाला आहे. या धोरणाविरुद्ध देशव्यापी जनआंदोलनाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
सरकारवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी तरुण आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीमार केला. त्यांनी “दिल्लीत जनरल डायर पुन्हा जिवंत झाला आहे,” अशी टिप्पणी केली. ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेऊनही त्यात अनेक त्रुटी राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिक्षेमुळे अनेकदा दृष्टिकोनात बदल घडतो, परंतु सरकारकडे तशी मानसिकता नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) लोकशाहीवर नव्हे, तर बळाच्या राजवटीवर विश्वास आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आंबेडकर म्हणाले की, जनआंदोलन हे असे आंदोलन आहे, ज्याला भले भले डायर घाबरतात, विरोधकांना आव्हान आहे त्यांनी हे आंदोलन देशभरात केले पाहिजे. दिल्लीतील ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील आंदोलकांना “दहशतवादी” म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या टीकेला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, सरकारच “दहशतवादी” आहे. मुंबईत आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे बेकायदेशीर असल्याचे सांगत, हे आरोप न्यायालयात टिकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप असल्याचे नमूद करत, राज्यातील विविध जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक संघटनांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली. भाजपशी सहमत नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी या ‘बंद’ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. कोणतीही हिंसा होऊ दिली जाणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम शांततापूर्णरीत्या पार पाडला जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला
- Rahul Gandhi : ‘यावेळी सुटणार नाही’, राहुल गांधींची थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची हाक
- शरद पवार जंतर-मंतरवर; अभिजित दीपकेंची घेतली भेट













