पुणे– महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्ष फोडण्याचं जे पेव फुटलंय, ते नक्की कधी थांबणार? हा प्रश्न आता सर्वसामान्यांनाच नाही, तर राजकीय नेत्यांनाही पडू लागला आहे. राज्यात एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असतानाच, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक असा राजकीय बॉम्ब फोडलाय, ज्यामुळे प्रस्थापित नेत्यांची चांगलीच झोप उडणार आहे.
लक्ष्मण हाकेंनी थेट आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणाच करून टाकली. आगामी काळात ओबीसींच्या हक्कासाठी ते ‘ओबीसी जनता पार्टी’ (OBC Janta Party) या नव्या झेंड्याखाली मैदानात उतरणार आहेत. पण ही घोषणा करताना त्यांनी थेट भाजपच्या कार्यपद्धतीवर जे गंभीर आरोप केलेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Laxman Hake on BJP : भाजपचा DNA आता ओबीसींचा राहिला नाही
सत्तेत असताना भाजपला सारखी पक्ष फोडाफोडी करण्याची काय गरज पडली? असा थेट सवाल हाकेंनी उपस्थित केला. एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर अजितदादांच्या गटाला सत्तेत घेण्याची खरंच काय गरज होती? असा प्रश्न विचारत ते म्हणाले की, “भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिलेला नाही, तो आता थेट कारखानदारांचा झालाय. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हेच आता भाजपचे खरे डीएनए आहेत.”
दुसरीकडे, पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ‘पक्ष फोडणं बंद करण्याची सद्बुद्धी मिळो’, असं साकडंही हाकेंनी पांडुरंगाकडे घातलं आहे. सत्ता आणि मुख्यमंत्री येत-जात असतात, पण आता नेत्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम सुरू करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी सडकून टीका केली. दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच असून एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवणं हा केवळ जनतेला दाखवण्यासाठी केलेला देखावा असल्याचा मोठा दावा हाकेंनी केलाय. सत्तेच्या वळचणीला जाऊन केवळ कारखाने काढण्यापलीकडे या नेत्यांनी शोषित वर्गासाठी आणि ओबीसींसाठी कधीच कोणताही लढा उभारला नाही, असा घणाघात लक्ष्मण हाकेंनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात हाके यांचा हा नवा पक्ष नेमकं कुणाचं राजकीय गणित बिघडवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा
- मोठा राजकीय ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना पूर्णविराम
- अल निनोचा धोका खरंच टळलाय का? हवामान तज्ज्ञांचा यंदाच्या पावसाबाबत सर्वात मोठा अंदाज













