🕒 1 min read
मुंबई: अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असतानाच, पापाराझींच्या वागणुकीवर पुन्हा एकदा तिनं ( Kajol ) आपला संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हिडीओनंतर ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी तिची तुलना केली जात होती. आता याच मुद्द्यावर ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काजोलने पापाराझींना लक्ष्य करत, त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “पापाराझी तुम्हाला तसं वागण्यास भाग पाडतात!” असं म्हणत, एखाद्या अंत्यविधीसारख्या संवेदनशील ठिकाणीही त्यांच्या उपस्थितीबद्दल तिनं तीव्र नाराजी व्यक्त केली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि पापाराझींच्या सततच्या पाठलागावर बोलताना काजोल म्हणाली, “जर तुम्हाला मी भीतीदायक वाटत असेन, तर ठीक आहे. कृपया माझा ‘माँ’ हा चित्रपट पहा.” तिने पुढे स्पष्ट केलं की, “मला असं वाटतं की हल्ली सगळं काही व्हिडीओंच्या माध्यमातूनच होत असतं. पापाराझीसुद्धा तेच करतात. तुम्ही काहीतरी म्हणाल, याची ते वाट पाहतात. जोपर्यंत तुम्ही त्यांना एखादी प्रतिक्रिया देत नाही, तोपर्यंत ते तुमच्या मागे लागतात, सतत प्रश्न विचारतात.”
Kajol Criticizes Paparazzi
काजोलने हेही मान्य केलं की, “त्यांच्यावर ओरडणं चुकीचंच आहे. परंतु त्यांना आपण शांतपणे सांगू शकतो की, फोटो काढण्यासाठी ओरडण्याची गरज नाही. तुम्ही शांत व्हा.” पापाराझींच्या हेतूंवर बोट ठेवताना काजोलनं एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली, “हे सर्व फक्त फोटो किंवा व्हिडीओ काढण्याबद्दल नाहीये. त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. कारण त्याच्यासोबत एक टॅगलाइन जोडलेली असते किंवा त्यांना एखादी नकारात्मक टॅगलाइन जोडायची असते.” त्यामुळेच आपण पापाराझींबाबत थोडी जागरूकच असतो, असंही तिनं ( Kajol ) नमूद केलं.
पापाराझींनी कोणत्या मर्यादा पाळायला हव्यात, यावर काजोलने तिचं परखड मत मांडलं. विशेषतः अंत्यविधीसारख्या प्रसंगी पापाराझींच्या उपस्थितीवर तिने तीव्र आक्षेप घेतला. “माझ्या मते, काही जागा अशा असतात, जिथे त्यांनी जायला नाही पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला ते जेव्हा कलाकारांच्या मागे पळतात आणि फोटो क्लिक करतात, ते पाहून मला खूप विचित्र वाटतं. हे सर्व मला अपमानास्पद वाटतं,” अशा शब्दांत तिनं आपला संताप व्यक्त केला.
केवळ अंत्यविधीच नाही, तर सामान्य ठिकाणीही होत असलेल्या पाठलागाबद्दल तिने नाराजी व्यक्त केली. “इतकंच काय, तर सहज कुठे जेवायला गेलो तरी ते पाठलाग करत मागे येतात. जुहू ते वांद्र्यापर्यंत ते आमचा पाठलाग करत येतात. मी कुठे जातेय, कोणाला भेटते, कोणत्या इमारतीत जाते हे सर्व पाहण्यासाठी ते असं करतात. मला या सगळ्यांचा त्रास होतो,” असं ती ( Kajol ) स्पष्टपणे म्हणाली.
पापाराझींच्या व्यवहारावर यापूर्वी अनेक कलाकारांनी टीका केली आहे. जया बच्चन, तापसी पन्नू अशा अनेक अभिनेत्रींनी यावर आपली भूमिका मांडली आहे. काजोलच्या या स्पष्टीकरणामुळे पापाराझी संस्कृतीवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाला असून, सोशल मीडियावर तिच्या भूमिकेला अनेकांकडून पाठिंबा मिळत आहे. काजोलचा ‘माँ’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्याच्या प्रमोशनसाठी ती विविध माध्यमांमध्ये दिसत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राहुल-पंत यांच्यावर संथ खेळाचा आरोप; इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची गरज
- “हिंदूंमध्ये फूट म्हणजे जिहाद्यांना मदत” नितेश राणेंचा संताप; मनसेला झणझणीत उत्तर!
- “मी बंडात गेलो असतो, तर उघडपणे गेलो असतो!” – जाधव यांचा स्फोटक दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now