🕒 1 min read
अध्यात्माच्या वाटेवर चालताना कधी काय वळण येईल हे सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. नव्वदच्या दशकात आपल्या ‘ग्लॅमर’ने बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. वर्षभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात स्वीकारलेल्या ‘किन्नर आखाड्या’च्या महामंडलेश्वर पदाचा ममता यांनी तडकाफडकी राजीनामा (Resignation) दिला आहे.
Mamta Kulkarni Resignation
विशेष म्हणजे, राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी भगव्या वस्त्रांबाबत केलेलं विधान सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. ममता यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली होती. “भगवे वस्त्र परिधान करणे म्हणजे भाजप किंवा कुणाचा एजंट होणे नाही, लवकरच मी हे भगवे वस्त्र काढून टाकेल,” असा मोठा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी राजीनामास्त्र उपसल्याने अध्यात्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ममता कुलकर्णी यांनी 27 जानेवारी 2026 रोजी लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणतात, “मी पूर्णपणे शुद्धीत हा निर्णय घेत आहे. माझा कोणावरही राग नाही, उलट आखाडा प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याबद्दल मला आदरच आहे.” मात्र, पुढे त्यांनी मांडलेला विचार जास्त महत्त्वाचा आहे.
अध्यात्मिक गुरू जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांचा दाखला देत ममता म्हणतात, “सत्याला कोणत्याही वस्त्राची किंवा प्रतिमेची (Image) गरज नसते. माझे गुरू गगनगिरी नाथ यांनीही कधी पद स्वीकारले नाही.” त्यामुळे यापुढे कोणत्याही विशिष्ट गटाचा ‘टॅग’ न लावता आपण अध्यात्मिक जीवन जगणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
गेल्या वर्षी (2025) प्रयागराज महाकुंभमध्ये ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेत ‘श्री यमाई ममता नंदगिरी’ हे नाव धारण केले होते. त्यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला होता. मात्र, अवघ्या वर्षभरातच या पदावरून आणि भगव्या वस्त्रांवरून त्यांनी घेतलेला हा ‘यू-टर्न’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana : जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक! १ लाख महिलांचे पैसे अडकले?
- “फक्त मुंब्रा कशाला, अख्खा हिंदुस्थान ‘हिरवा’ करा!”; अभिजीत केळकरचा MIM नगरसेविकेला टोला
- 14 चेंडूत 50! न्यूझीलंडला फोडूनही युवराजने अभिषेकला ‘का’ डिवचलं? म्हणाला, ‘अजूनही तुला…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












