Girish Mahajan | “‘ही’ परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे”; महाजनांचं आश्विनी जगताप यांच्या भेटीनंतर वक्तव्य

Girish Mahajan | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातून भाजपकडून दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील सदस्यालाच उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना चिंचवड मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. तर कसबा मतदारसंघातून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आश्विनी जगताप यांची भेट घेतली आहे.

“कसबा आणि चिंचवडची दोन्ही नाव जाहीर झाली आहे. त्यामुळं आम्ही विधानसभा पोटनिवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. सकाळी महाराष्ट्रातील सर्व सीईओंची ग्रामविकास खात्याची बैठक होती. तिथं गेलो होतो. पण, तिकीट जाहीर झाल्यानं चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना भेटण्यासाठी आलो. कसब्यामध्येही जाणार आहे”, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.

आणखी काय म्हणाले गिरीश महाजन?

“चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं विजय मिळेल की, नाही हा विषयचं होऊ शकत नाही. विजय हा 100 टक्के भाजपचा होणार आहे. माजी आमदारांचं काम, त्यांचं राहिलेलं स्वप्न यांची मतदारांना माहिती आहे. त्यामुळं जगताप यांच्या घरातचं तिकीट मिळालं आहे”, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

“शंकर जगताप यांची तीन-चार वेळा या आठवड्यात भेट झाली. जगताप कुटुंबीयात कुठलाही संघर्ष नाही. जगताप कुटुंबीयांच्या घरात चांगलं वातावरण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीने ते राहतात. लक्ष्मण जगताप असताना असलेली परिस्थिती आजही आहे. त्यामुळं शंकर जगताप यांच्याकडे निवडणुकीची धुरा दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी तसं जाहीरही केलं आहे”, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

“एखादा आमदार यांचं निधन झाल्यास ती जागा त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला देण्याची प्रथा आहे. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे”, असे आवाहन करत गिरीश महाजन यांनी “चिंचवडची जागा बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. काही ठिकाणी उमेदवार वेळेवर ठरलेत. आम्ही विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कमी पडलो. पण, पुढं येणाऱ्या निवडणुकीत आम्ही नक्की विजय मिळवू”, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.