पुणे – मित्रपक्षानेच जर सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली तर राजकीय समीकरणे कशी बदलू शकतात? विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच एक नाट्यमय प्रकार समोर आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील जागावाटपाच्या वादामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह आता थेट रस्त्यावर आला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यानंतर आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी त्यांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. या निवडणुकीत महायुतीमधील अनेक जागांवर बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे मित्रपक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाने थेट भाजपच्या उमेदवाराविरोधातच शड्डू ठोकल्याने या वादाला तोंड फुटले आहे.
या बंडखोरीचे समर्थन करताना सत्तारांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत आमचे मुकुट गेले असून आता छोट्या निवडणुकांमध्येही भाजप आमच्यात दोन गट पाडत असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. मोठा भाऊच युती संपवत असून आमचे मुंडके छाटण्याचे काम सुरू असल्याचा थेट आरोप सत्तारांनी केला होता.
सत्तारांच्या या युती तोडण्याच्या विधानावर आता गिरीष महाजन यांनी पलटवार केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, सत्तार आता शिवसेनेचे खूप मोठे नेते झाले आहेत. ते आता थेट भाजपसोबत युती ठेवायची की नाही यावर विचार करायला लागले आहेत, ही आश्चर्यकारक बाब आहे.
महाजन यांनी सत्तारांना त्यांच्या मर्यादेत राहण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. महाजन म्हणाले की, युती ठेवायची की नाही याचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे सत्तारांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये आणि फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरतेच मर्यादित बोलावे.
दुसरीकडे, सत्तार हे वैयक्तिकरीत्या माझे चांगले मित्र असले तरी त्यांनी जाहीरपणे अशी विधाने करणे चुकीचे आहे, असे महाजन म्हणाले. महायुतीमध्ये विनाकारण मिठाचा खडा टाकून वातावरण खराब करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. या विधानांमुळे महायुतीचे काहीही बिघडणार नसले, तरी निवडणुकीच्या काळात अशी विधाने टाळावीत, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण वादामुळे संभाजीनगरमधील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्तारांच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात आणि महायुतीमधील हा अंतर्गत वाद कसा मिटवला जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमीर खान वयाच्या ६१ व्या वर्षी करणार तिसरं लग्न? गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाची तारीख अखेर समोर!
- फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जाचक अटी; विरोधकांचा मोठा हल्लाबोल अन् शेतकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
- सावधान! समुद्रात उसळणार महाकाय लाटा; पावसाळ्यातले ‘हे’ ६ दिवस घराबाहेर पडूच नका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












