Bullet bike & Pistol Stunt | हातात पिस्तुल घेऊन चालत्या बाईकवर स्टंट; सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल…

Bullet bike & Pistol Stunt | सोलापूर : टीम महाराष्ट्र देशा- हात सोडून बुलेट चालवणे अन् चालत्या बुलेटवर पिस्तूल काढून स्टंट करणे (Bullet & Pistol Stunt) आणि त्याचा रिल्स बनवून फेसबुकवर पोस्ट करणे सोलापूरातील एका नगरसेवकाच्या पुत्राला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन नागेश गायकवाड (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक पुत्राचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रंगपंचमी या सणाच्या दिवसी तरुणाई रंगाची उधळण करीत नव्या जोशात अन् उत्साहात असते. रंग खेळातानाचे रिल्स बनवून ते समाज माध्यमांवर अपलोड करणे (Uploading to Social Media) हल्ली प्रतिष्ठेचं मानलं जात आहे. सोलापूरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेश गायकवाड (NCP corporator Nagesh Gaikwad) यांचा पुत्र चेतन हा देखील याला अपवाद राहिला नाही. या नगरसेवक पुत्राने चक्क हात सोडून बुलेट तर चालविलीच पण कहर म्हणजे चालत्या बुलेटवर पिस्तूल काढून स्टंट देखील केला.

या स्टंट व्हिडिओचे रिल्स बनवून त्याने फेसबुकवर पोस्ट केले, रिल्स व्हायरल देखील झाले, फॉलोअर्सच्या लाईक अन् कमेंटस् ने तो चांगलाच भारावून गेला. दरम्यान हा व्हिडिओ नेमका सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पाहिला. अन् त्यानंतर या नगरसेवक पुत्रावर व व्हिडिओ शुट करणाऱ्या त्याच्या साथीदारावर भारतीय हत्यार कायद्यातंर्गत व भादंवि ५०५ व २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे अल्पावधीतच या नगरसेवक पुत्राच्या आनंदावर विरजण पडले.

सोलापूर शहर पोलीसांकडून अद्याप त्यांना अटक करण्यात आली नसली तरी रिल्समध्ये दिसणारे पिस्तूल पोलीसांकडून जप्त करण्यात येणार आहे. त्यानंतरच ते पिस्तूल खरे आहे की बनावट आहे याचा उलगडा होणार आहे. मात्र तुर्तास तरी या नगरसेवक पुत्राची व त्याच्या साथीदाराची जेलवारी निश्चित झाली असल्याचे बोलले जात आहे.

‘ती ‘ तलवार तर लाकडी निघाली; आता या पिस्तूलचे लायटर होईपर्यंत पोलीस थांबणार का?

हिंदू जनगर्जना मोर्चात राष्ट्रवादीचे महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे याने हातात तलवार घेऊन ती हवेत फिरवली होती. त्यामुळे फौजदार चावडी पोलीसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपासात ती तलवार लाकडाची असल्याचे निष्पन्न झाले होते. पण पोलीसांनी तात्काळ कारवाई करुन ती तलवार ताब्यात घेतली असती तर ती खरी आहे की खोटी हे लगेच समजले असते. आता नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड याची पिस्तूल जप्त करून तिची शहानिशा केली जाईपर्यंत पिस्तूलचे रुपांतर पिस्तूल सारख्या दिसणाऱ्या लायटर मध्ये होऊ शकते. असा तर्क सोलापूर शहरवासीयांतून लावला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –